चंदगडचे भाजप आ. शिवाजी पाटील यांचे विरोधकांना आवाहन
(अनंत नलावडे)
मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाला बुधवारी नवे वळण मिळाले.महामार्गाला विरोध करणाऱ्यांवर थेट हल्लाबोल करत चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी, “विकासाच्या प्रकल्पाला विरोध करून जनतेची माथी भडकवू नका.राजकारण बाजूला ठेवून या भागाच्या भवितव्याचा विचार करा,” असे ठणकावून सांगितले. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवरही जोरदार टीका करत शक्तीपीठ महामार्ग हा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अविकसित भागांसाठी ‘गेमचेंजर’ प्रकल्प ठरणार असल्याचा दावा केला.
“६० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप म्हणजे राजकीय स्टंट”…..
महामार्गाच्या कामात ६० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.त्यावरही प्रत्युत्तर देताना आ.पाटील म्हणाले, “भ्रष्टाचाराचे आरोप हे केवळ भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केले जात आहेत.जनतेला संभ्रमात टाकण्याचा हा राजकीय डाव आहे.आजही चंदगडसह सीमाभागातील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे.अशात १६ धनगरवाड्यांसह अनेक दुर्गम भाग विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.रोजगारासाठी युवकांना स्थलांतर करावे लागत आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे उद्योग, व्यापार आणि रोजगाराच्या संधी निर्माण होऊन या भागाचे आर्थिक चित्र बदलू शकते, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या महामार्गामुळे महापूर येईल, शेतीचे नुकसान होईल, या विरोधकांच्या दाव्यांनाही आ.पाटील यांनी फेटाळले.”तांत्रिक अभ्यास आणि पर्यावरणीय निकषांचा विचार करूनच प्रकल्पाची आखणी होत आहे. पूर्वीही महामार्गांना विरोध झाला, पण नंतर त्याच भागांचा विकास झाला,” असेही त्यांनी ठासून सांगितले.
“प्रसंगी शेतकऱ्यांच्या दारात जाऊ; पण विकास रोखू देणार नाही”…..
शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सरकार तयार असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, “गरज पडल्यास आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ, घराघरात जाऊ. त्यांच्या अडचणी सोडवू; मात्र प्रकल्पच रद्द करण्याची मागणी स्वीकारली जाणार नाही.” कालच्या ‘मोर्चात शेतकरी कमी, राजकारणी जास्त’ असे वर्णन करत, महामार्गा विरोधातील आंदोलनांवर टीका करताना आ.पाटील म्हणाले, “विरोधी मोर्चांमध्ये शेतकऱ्यांपेक्षा राजकीय नेत्यांची संख्या अधिक दिसली.त्यामुळे हा शेतकऱ्यांचा लढा कमी आणि राजकीय अजेंडा जास्त वाटतो,” असा थेट आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वापरल्या जाणाऱ्या भाषेवरही त्यांनी आक्षेप घेतला.”विरोधकांनी जरूर टीका करावी, पण मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना सभ्यता आणि भान राखावे,” असा इशाराच त्यांनी दिला.
आ. शिवाजी पाटील यांच्या शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेतून एक मात्र स्पष्ट झाले की, शक्तीपीठ महामार्गावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आगामी काळात संघर्ष तीव्र होत जाईल.कारण भाजपने हा प्रकल्प ‘विकासाचा महामार्ग’ म्हणून पुढे रेटण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर विरोधकांच्या आंदोलनाला ‘राजकीय प्रेरित’ ठरवत जनतेसमोर विकास विरुद्ध विरोधक असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून सुरू असल्याचे स्पष्ट झाले.