महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर”…. तर घरभाडे भत्त्यातही वाढ
परिवहन मंत्री सरनाईक यांची मोठी घोषणा
(अनंत नलावडे)
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या आर्थिक मागण्यांना अखेर न्याय मिळाला असून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी मोठी घोषणा करत एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. यासोबतच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात येणार असल्याने राज्यातील सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मुंबई सेंट्रल येथील ‘वाहतूक भवन’मध्ये कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सरनाईक यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनांनीही या भूमिकेचे स्वागत केले आहे.
सरनाईक यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, यापुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जाहीर होताच तो एसटी कर्मचाऱ्यांनाही तात्काळ लागू करण्यात यावा.त्यामुळे महागाई भत्त्यासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार नाही.तसेच वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येईल, असेही त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कर्मचारी संघटनांची विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाहीही सरनाईक यांनी दिली.
कामगार संघटनांशी सातत्याने संवाद ठेवून प्रलंबित प्रश्न सोडविले जातील, असे सांगताना सरनाईक यांनी प्रत्येक संघटनेचा एक प्रतिनिधी असलेली समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले.महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी समितीच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. महामंडळाच्या आधुनिकीकरणावर भर देताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार नवीन बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत.राज्य सरकारने २०३५ पर्यंत एसटीचा संपूर्ण ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले असून त्यासाठी राज्यभर चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारले जाणार आहे.
अवैध वाहतुकीविरोधात धडक मोहीम
बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम सुरू असून त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “कर्मचारी आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून एसटी महामंडळ अधिक सक्षम, प्रवासी-केंद्रित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे सांगत कर्मचाऱ्यांच्या हिताच्या निर्णयांना प्राधान्य दिले जाईल, अशीही ग्वाही सरनाईक यांनी दिली.