आश्रमशाळांमध्ये दर्जेदार सुविधा अन् गुणवत्तापूर्ण शिक्षण डॉ. अशोक वुईके

0

चणकापूर येथे प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी

आश्रमशाळांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पात्रताधारक शिक्षकांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आश्रमशाळेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती तसेच लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.


सोमवारी (दि.१५) चणकापूर शासकीय आश्रमशाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार नितीन पवार, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त डिगाम्बर चव्हाण, दिनकर पावरा, कळवण प्रकल्प अधिकारी काश्मिरा संखे, अधीक्षक अभियंता प्रदीप दळवी, एन. डी. गावित आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे गणवेश देण्यात विलंब होत आहे. आश्रमशाळेत नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या 5 जुलैपर्यंत गणवेश जाईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत नर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. आश्रमशाळेचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी वार्षिक नियोजन कृती आराखडा तयार करण्यात असल्याचे आदिवासी विकास आयुक्त बनसोड यांनी सांगितले. तर प्रकल्प अधिकारी संखे यांनी प्रस्तविकेत आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री डॉ. वुईके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत आपुलकीने संवाद साधत स्नेहभोजन केले. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचा आनंद द्विगुणीत झाला.

 

अपप्रचाराला बळी पडू नये
आश्रमशाळाबाबत सोशल मीडियावर अपप्रचार केला जात आहे. विद्यार्थीप्रती राजकारण करू नये. आंदोलन करण्यापूर्वी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करावी. पालकांनीही सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले

 

डिजिटल इन्व्हरमेंट स्टुडिओचे अनावरण
आदिवासी विकास विभागामार्फत अपर आयुक्त कार्यालयात डिजिटल इन्व्हरमेंट स्टुडिओ उभारण्यात आला आहे. या स्टुडिओचे अनावरण आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, नाशिक प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, अपर आयुक्त डिगाम्बर चव्हाण, दिनकर पावरा, उपायुक्त संतोष ठुबे, निलेश अहिरे आदी उपस्थित होते. स्टुडिओच्या माध्यमातून  मंत्री डॉ. वुईके यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech