अमेरिकेविना इस्रायलचे अस्तित्वच नसते- ट्रम्प

0

पॅरिस : फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-७ शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलविषयी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. ट्रम्प यम्हणाले कि, अमेरिकेविना इस्रायलचे अस्तित्वच टिकले नसते. जी-७ शिखर परिषदेदरम्यान कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा करताना ट्रम्प म्हणाले, “अमेरिकेशिवाय इस्रायल अस्तित्वात नसता. माझ्याशिवाय इस्रायल नसता, कारण मी जे केले ते करण्यास इतर कोणताही राष्ट्राध्यक्ष तयार नव्हता. मी हस्तक्षेप केला नसता, तर इस्रायल फार पूर्वीच संपुष्टात आला असता.”

इराणसोबत या आठवड्यात होणाऱ्या शांतता करारापूर्वी ट्रम्प यांनी इस्रायलने लेबनॉनवरील बॉम्बहल्ले तात्काळ थांबवावेत, अशी मागणी केली आहे. आपले सहकारी बेंजामिन नेतान्याहू यांच्याविषयी बोलताना ट्रम्प म्हणाले, “आमचे संबंध चांगले राहिले आहेत, पण आता त्यांना लेबनॉनच्या बाबतीत अधिक जबाबदारीने वागावे लागेल.” त्यांनी लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांना क्रूर आणि अतिरेकी स्वरूपाचे असल्याचे म्हटले.

इराणसोबतचा शांतता करार अंतिम होण्याच्या अवघ्या दोन तास आधी इस्रायलने बेरूतवर बॉम्बहल्ला केल्यानंतर ट्रम्प यांची नाराजी अधिकच वाढली. वृत्तानुसार, या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्याशी अत्यंत कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. हल्ल्याची वेळ आणि पद्धत त्यांना अजिबात पसंत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प म्हणाले की, हिजबुल्लाच्या एखाद्या सदस्याला लक्ष्य करण्यासाठी संपूर्ण निवासी इमारत उद्ध्वस्त करणे योग्य नाही, कारण त्यामध्ये निष्पाप नागरिकही राहतात. ट्रम्प यांनी एक नवा प्रस्ताव मांडत सांगितले की, जर इस्रायलला निष्पाप नागरिकांचा बळी न घेता हिजबुल्लाला रोखणे शक्य नसेल, तर हे काम सीरियाकडे सोपवावे. त्यांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शरा यांचे कौतुक करत ते हे काम अधिक प्रभावीपणे करू शकतात, असे म्हटले. नेतान्याहू यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास, हिजबुल्लाविरोधातील कारवाईसाठी अमेरिका सीरियासोबत भागीदारी करू शकते, असे संकेतही त्यांनी दिले.

इराणसोबत होणाऱ्या शांतता कराराबाबत ट्रम्प यांनी विश्वास व्यक्त करत हा करार यशस्वी होईल, असे म्हटले. अमेरिका इराणला आर्थिक मदत करत असल्याच्या अफवांचे त्यांनी खंडन केले. पाकिस्तान आणि कतार यांच्या प्रयत्नांमुळे हा करार शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांनीही या कराराचे स्वागत करत तो संपूर्ण आखाती प्रदेशासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले.

दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे या शांतता कराराबाबत नाराज असल्याचे दिसून आले. सोमवारी झालेल्या एका माध्यम परिषदेत त्यांनी सांगितले की, इस्रायलला इराण आणि त्याच्या समर्थकांकडून अजूनही धोका आहे. गाझा, लेबनॉन आणि सीरियामध्ये उभारण्यात आलेले सुरक्षा क्षेत्र देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असेपर्यंत कायम ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech