भारताच्या नौदल ताफ्यात एकाच वेळी ३ जहाजांचा समावेश; नौदलाची युद्धक्षमता वाढणार

0

‘ट्राय-कमिशनिंग’मुळे भारताच्या युद्धनौका निर्मिती क्षमतेला चालना मिळेल – नौदल प्रमुख

नवी दिल्ली : भारताच्या नौदल ताफ्यात रविवारी एकाच वेळी तीन जहाजांचा समावेश होणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. यामुळे भारतीय नौदलाची समुद्रातील ताकद अधिक वाढली आहे. यापैकी एक जहाज खोल समुद्र आणि किनारी भागांतील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी विशेषतः तयार करण्यात आले असून, त्यामुळे शोध व बचाव मोहिमा अधिक वेगाने राबवता येणार आहेत. घातक ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, टॉर्पेडो आणि रडारपासून बचाव करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या आयएनएस दुनागिरीच्या समावेशामुळे नौदलाची युद्धक्षमता वाढणार आहे. तसेच नौदलात दाखल करण्यात आलेले आयएनएस अग्रय हे पाणबुडीविरोधी युद्धनौक असून, त्यामुळे समुद्रातच शत्रूच्या पाणबुड्यांचा नाश करण्याची क्षमता अधिक बळकट होणार आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तीन अत्याधुनिक स्वदेशी जहाजे आयएनएस अग्रय, आयएनएस दुनागिरी आणि आयएनएस संशोधक राष्ट्राला समर्पित केली. या तिन्ही जहाजांचा औपचारिकरित्या नौदलात समावेश होणे हे भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक मानले जात आहे. तिन्ही जहाजांची निर्मिती भारतात स्वदेशी साहित्याचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या सागरी देखरेख, सुरक्षा आणि संशोधन क्षमतांना मोठी बळकटी मिळणार आहे.

आयएनएस संशोधक हे भारतीय नौदलाचे अत्याधुनिक स्वदेशी सर्वेक्षण जहाज आहे. ते ‘संधायक’ श्रेणीतील सर्वेक्षण जहाजांचे चौथे आणि अंतिम जहाज असून, खोल समुद्र तसेच किनारी भागांतील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आले आहे. या जहाजाची निर्मिती कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स येथे करण्यात आली असून, त्यात ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. हे जहाज डिजिटल साइड-स्कॅन सोनार आणि स्वायत्त पाण्याखालील वाहनांसह अत्याधुनिक सर्वेक्षण उपकरणांनी सुसज्ज आहे. या जहाजाचे वजन सुमारे ३,४०० टन आहे. सर्वेक्षणाबरोबरच हे जहाज आपत्कालीन परिस्थितीत शोध आणि बचाव मोहिमांमध्ये मदत करण्यास तसेच नौदलासाठी महत्त्वपूर्ण सागरी व किनारी माहिती संकलित करण्यास सक्षम आहे. त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या सागरी देखरेख, सुरक्षा आणि संशोधन क्षमतांना मोठी मजबुती मिळणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech