‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

0

आगामी ६ जुलैला सर्व आरोपींना एकत्र हजर राहण्याचे आदेश

चेन्नई : ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या विशेष शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन याची सोमवारी न्यायालयात व्हर्च्युअल हजेरी झाली. मात्र, या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, अल्लू अर्जुनसह इतर सर्व आरोपींना पुढील सुनावणीला एकत्रितपणे हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.

सोमवारी हैदराबादमधील नामपल्ली फौजदारी न्यायालयाने संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणाची सुनावणी ६ जुलैपर्यंत स्थगित केली. ‘पुष्पा २’च्या विशेष शोदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेत अभिनेता अल्लू अर्जुनलाही आरोपी करण्यात आले आहे. काही आरोपी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहू न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, अल्लू अर्जुनने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यवाहीत सहभाग नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

संध्या थिएटर व्यवस्थापनाच्या वतीने बाजू मांडणारे वकील भानू चंदर यांनी न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “आज जामीनपत्र दाखल करण्यासाठी नामपल्ली येथील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहणे अपेक्षित होते. पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद केलेल्या एकूण २३ आरोपींपैकी २१ किंवा २२ जण हजर झाले होते, मात्र एक-दोन आरोपी अनुपस्थित होते. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी ६ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. पुढील सुनावणीवेळी सर्व २३ आरोपींनी एकत्रितपणे न्यायालयात हजर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech