मराठीबाबत दिलगिरी व्यक्त; चुका अनवधानाने झाल्याचा विधानसभा अध्यक्षांचा खुलासा

0

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान झालेल्या मराठी उच्चार आणि वाचनातील चुकांबाबत सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आहे. पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनानंतर मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावात मराठी वाचनाच्या २६ हून अधिक चुका झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नार्वेकर यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाबाबत कठोर शब्दांत टीका केली होती. सामाजिक माध्यमांवरही या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्टीकरण देत मनापासून दिलगिरी व्यक्त केली.

नार्वेकर म्हणाले की, त्या दिवशी सभागृहात एकूण १२ शोकप्रस्तावांचे वाचन करण्यात आले होते. त्यांच्या हातात आलेली प्रत अतिशय बारीक अक्षरांमध्ये छापलेली होती आणि ती काही प्रमाणात अस्पष्टदेखील होती. तसेच त्या मजकुरात काही तांत्रिक त्रुटी होत्या, ज्या सुरुवातीला निदर्शनास आल्या नव्हत्या. वाचन सुरू असताना जसा मजकूर होता तसाच तो वाचला गेला आणि त्यातून काही चुका घडल्या असल्याचे त्यांनी मान्य केले.

आशाताई भोसले यांच्याबद्दल बोलताना नार्वेकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती त्यांच्या संदर्भात अवमानकारक भाष्य करण्याचा विचारही करू शकत नाही. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून तर अशी गोष्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे घडले ते पूर्णपणे अनवधानाने आणि तांत्रिक कारणांमुळे घडले असून त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, अशी विनंती त्यांनी केली. तरीही या घटनेमुळे राज्यातील नागरिकांच्या किंवा सभागृहातील सदस्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आपण मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मराठी भाषेबद्दलची आपली बांधिलकीही त्यांनी अधोरेखित केली. गेली साडेचार वर्षे आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करत असून या काळात अनेक भाषणे आणि शोकप्रस्ताव मराठीतून मांडले आहेत. सभागृहाचे नियम, कार्यपद्धती आणि कामकाज प्रामुख्याने मराठी भाषेतूनच हाताळले असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहातील सदस्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला मराठी भाषेचा जितका अभिमान आहे, तितकाच अभिमान आपल्यालाही असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

नार्वेकर यांच्या या दिलगिरीमुळे सभागृहात काही प्रमाणात शांतता झाली. मात्र, काही सदस्यांनी या घटनेची जबाबदारी फक्त अध्यक्षांवर न टाकता, ज्यांनी ते भाषण प्रिंट करून दिले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. “ज्यांनी ती प्रिंट दिली आणि भाषण तयार केले, त्यांच्यावर कारवाई व्हावी,” अशी मागणी सदस्यांनी उपस्थित केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech