नवी दिल्ली : दिल्लीहून अमृतसरकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-479 या विमानात सोमवारी रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने ते नियोजित मार्गावरून भरकटले आणि थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरले. पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक प्राधिकरणाकडून इशारा मिळाल्यानंतरच वैमानिकांना याची माहिती मिळाली, त्यानंतर विमानाने तातडीने यू-टर्न घेत भारतीय हवाई क्षेत्राकडे परत वळण घेतले.ही केवळ मार्ग चुकण्याची सामान्य घटना नव्हती, कारण ज्या हवाई क्षेत्रात विमान गेले होते ते भारतीय विमानांसाठी सध्या पूर्णपणे बंद आहे.
पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने एप्रिल २०२५ पासून भारतीय नोंदणी असलेल्या सर्व नागरी आणि लष्करी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. हा बंदी आदेश दर महिन्याला नोटम जारी करून वाढवला जातो. AI-479 चे विमान भरकटले त्या रात्रीही ही बंदी लागू होती. त्यानंतर १६ जून रोजी जारी करण्यात आलेल्या नव्या नोटमनुसार ही बंदी २४ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.याच कारणामुळे विमान पाकिस्तानच्या लाहोर फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये प्रवेश करताच तेथील एअर ट्रॅफिक प्राधिकरणाने तातडीने इशारा दिला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध आधीच तणावपूर्ण आहेत. अशा परिस्थितीत बंदी असलेल्या हवाई क्षेत्रात भारतीय विमान शिरल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. मात्र, अमृतसर विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान पाकिस्तानच्या सीमेत सुमारे दीड मैलांपेक्षा अधिक आत गेले नव्हते. विमानाने सोमवारी रात्री ९.१८ वाजता दिल्लीहून उड्डाण केले होते. त्याचे अमृतसरमध्ये रात्री १०.३० वाजता उतरणे अपेक्षित होते, परंतु मार्गात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे नेव्हिगेशन प्रणालीमध्ये अडथळा निर्माण झाला आणि विमान सीमापार गेले.
भारतीय हवाई क्षेत्रात परतल्यानंतरही अडचणी संपल्या नाहीत. तोपर्यंत अमृतसर विमानतळावर वाहतूक वाढल्याने विमानाला त्वरित उतरण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे विमान काही काळ अमृतसर परिसरात घिरट्या घालत राहिले. त्यानंतर नियंत्रण कक्षाच्या सूचनेनुसार ते पुन्हा दिल्लीला वळवण्यात आले, जिथे त्याचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
सुमारे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर विमानाला पुन्हा अमृतसरसाठी उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली आणि अखेर सोमवारी-मंगळवारी मध्यरात्री सुमारे २.२० वाजता ते अमृतसर विमानतळावर सुरक्षित उतरले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे प्रवाशांना जवळपास चार तासांचा विलंब सहन करावा लागला.
विमानतळ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, धावपट्टीची उपलब्धता आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे विमानाला हवेत काही काळ प्रतीक्षा करण्यास सांगणे ही सामान्य प्रक्रिया आहे. मात्र, या प्रकरणात मुख्य कारण तांत्रिक बिघाड आणि विमानाचे मार्गावरून भरकटणे हे असल्याचे सांगितले जात आहे. नेव्हिगेशन प्रणालीतील बिघाडाचे नेमके कारण काय होते, याचा तपास सध्या सुरू आहे.