गडचिरोलीती गेले दोन वर्ष रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने जनतेला त्रासाला सामोरे जावं लागत आहे, याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेशी संबंधित अत्यंत गंभीर बाब औचित्याच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णवाहिकांच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. गडचिरोली जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अखत्यारीतील पाच रुग्णवाहिका सर्व्हिसिंगसाठी चंद्रपूर येथील शोरूममध्ये देण्यात आल्या होत्या. यापैकी दोन रुग्णवाहिका सहा महिन्यांपूर्वी तर तीन रुग्णवाहिका दोन वर्षांपूर्वी सर्व्हिसिंगसाठी देण्यात आलेल्या. पण या रुग्णवाहिका अजूनही दुरुस्त करून परत मिळालेल्या नाहीत.
दुरुस्तीसाठी गेलेल्या या रुग्णवाहिकांचे इंजिन, गिअर बॉक्स यासारखे महत्त्वाचे भाग गायब देखील झाले आहेत. रुग्णवाहिकांचे सामान कसे गायब झाले, यामागे नेमका कोणाचा हात आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. रुग्णवाहिकांच्या देखभालीसाठी नियुक्त अभियंत्यांनी संबंधित शोरूमकडे वाहनांच्या दुरुस्तीबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली आहे अस वडेट्टीवार म्हणाले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात आधीच रुग्णवाहिकांची कमतरता असताना पाच रुग्णवाहिका बंद अवस्थेत पडून राहणे हे अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. या प्रकरणात कोणाच्या संगनमताने वाहनांचे साहित्य विकण्यात आले का, याचाही तपास होणे गरजेचे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत संबंधित रुग्णवाहिका तातडीने सुरू करण्याचे तसेच एवढा कालावधी उलटूनही त्या दुरुस्त का झाल्या नाहीत, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभेत दिले. गडचिरोलीतील रुग्णवाहिकांच्या गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.