लोहगड हत्या प्रकरण जलदगती न्यायालय आणि उज्वल निकमांच्या नियुक्तीस मुख्यमंत्र्यांची मान्यता

0

मुंबई : लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले. तसेच या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.

लोहगड हत्या प्रकरणात आपल्या प्रियकरासोबत कट रचून होणाऱ्या नवऱ्याला निर्दयीपणे संपवल्याच्या गुन्ह्यात आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतनला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी, पुणे पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तपासात आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाकडे वळवला असून थेट सियाच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरीकडे आपल्या मुलाच्या न्यायासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

दरम्यान, आपल्या मुलीने केलेल्या कृत्यामुळे जबर धक्का बसलेले सियाचे वडील अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. कालच त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. जनरल वॉर्डमध्ये येताच सियाच्या वडिलांनी माध्यमांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. ज्यावरून सियाच्या लग्नाबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे. सियावर या लग्नासाठी घरून कोणताही दबाव नव्हता. तिने स्वतःच्या मर्जीनेच केतनला पती म्हणून पसंत केले होते. जेव्हा केतन अग्रवालचे स्थळ त्यांच्याकडे आले, तेव्हा सिया प्रचंड आनंदी होती. तिने सुरुवातीला केतनला फोटोमध्ये पाहिले आणि तो तिला आवडला, असे सियाच्या वडिलांनी म्हटले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech