अयोध्या : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशावरुन त्यांनी राजीनामा दिला आहे. विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती संचालकांच्या पुष्टीनंतर ही मोठी घडामोड समोर आली. या कथित देणगी चोरी प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्राथमिक अहवालाच्या आधारे पहिला एफआयआर दाखल केला आहे.
राम मंदिरातील देणगी चोरीचा मोठा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी मोठा दबाव होता. या प्रकरणी ते सातत्याने विरोधकांच्या निशाण्यावर होते. चंपत राय यांच्यासोबतच ट्रस्टचे आणखी एक महत्त्वाचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती संचालकांनी या दोन्ही राजीनाम्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटत होते. गुरुवारी सकाळपासूनच चंपत राय यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, या चोरीच्या प्रकरणात पोलीस आणि तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली असून, काल, गुरुवारी रात्रीच तब्बल आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. राम मंदिराच्या सुरक्षेतील आणि व्यवस्थापनातील हा मोठा दोष समोर आल्यानंतर ट्रस्टच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, ज्यामुळे अखेर या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पायउतार व्हावे लागले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शुक्रवारी या प्रकरणी एक निवेदन जारी केले. त्यांनी म्हटले की, जो कोणी लोकांच्या श्रद्धेशी छेडछाड करेल, त्याच्या विरोधात ते शून्य-सहिष्णुता धोरणानुसार कारवाई करतील. अयोध्या हे आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहे. अयोध्येवर कलंक लावू नका. श्रीरामाच्या प्रतिष्ठेचा आदर करायला शिका. मी म्हटले होते की, एसआयटीच्या अहवालावर कारवाई केली जाईल. एसआयटीचा अहवाल आला आहे. कारवाई सुरू झाली आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राम मंदिर ट्रस्टशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी बँकेत जमा होणाऱ्या रक्कमेचा आणि रोज दान पेटीत जमा होणार्या रक्कमेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. एका दान पेटीत एकावेळी ६ ते ७ लाख रुपये जमा व्हायचे. पण काही आठवडे 500 रुपयांच्या नोटांची बंडलं कमी आढळली. त्यावेळी संशय आला. नोट मोजण्याच्या खोलीत छुपे कॅमेरे लावले. छुप्या कॅमेऱ्याचं एक आठवड्याच फुटेज पाहिल्यानंतर लक्षात आलं की, नोट मोजण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले कर्मचारी सीसीटीव्ही समोर उभे राहतात आणि दुसरा सहकारी नोटांच्या बंडलातील नोट चोरी करुन कपड्यात लपवायचा. सदर प्रकरणी रामाशंकर उर्फ टिन्नू यादव, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, कमलेश पांडे, मनीष यादव, लवकुश मिश्रा, रामा शंकर मिश्रा आणि सुभाष श्रीवास्तव अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
प्रमुख घटनाक्रम
५ जून: मंदिरातील देणगीपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चर्चा सुरू.
७ जून: कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप सार्वजनिक.
१३ जून: उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.
१५ ते २० जून : बँक नोंदी, आर्थिक कागदपत्रे आणि संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी.
२३ जून : एसआयटीने प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे सादर केला.
२५ जून: आठ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल.
२६ जून: चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांनी ट्रस्टमधील पदांचा राजीनामा दिला.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आर्थिक गैरव्यवहाराच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे.