खदीजा जैश-ए-मोहम्मदची स्लीपर सेल

0

– दहशतवादी अबू उबैदाशी केला होता ऑनलाईन-निकाह
– पोलिस चौकशीत खदीजाने मान्य केले अपराध

जयपूर : राजस्थानच्या जयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली बबिता उर्फ खदीजा ही प्रतिबंधीत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदची स्लीपर सेल असल्याची माहिती पुढे आलीय. तसेच तिने आपला दहशतवादी हँडलर अबू उबैदाशी इंटरनेटवर ऑनलाईन निकाह केल्याचे देखील पोलिस चौकशीत मान्य केले आहे. पोलिस चौकशीदरम्यान खदिजाने कबूल केले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तिने सोशल मीडियावर पाकिस्तानी दहशतवाद्यांविषयी माहिती वाचण्यास सुरुवात केली होती. याच काळात ती जैशच्या हँडलर्सच्या संपर्कात आली. भारतात महिला स्लीपर सेल तयार करण्याचा प्रयत्न ती करत होती. गेल्या २० जून रोजी राजस्थान एटीएस आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाने संयुक्त कारवाई करून तिला तिच्या घरातून अटक केली. मूळची सवाई माधोपूर जिल्ह्यातील असलेली बबिता जयपूरमध्ये तिचे आई-वडील आणि भावासोबत राहत होती.

सुमारे दोन वर्षांपूर्वी तिचा पतीपासून घटस्फोट झाला होता.जैशच्या हँडलर्सच्या संपर्कात आल्यानंतर तिचे ब्रेनवॉश करण्यात आले, असा तपास यंत्रणांचा दावा आहे. त्यानंतर तिने एका पाकिस्तानी मौलवीकडून ऑनलाइन कलमा शिकला. तिने धर्मांतर करून आपले नाव खदीजा असे ठेवले आणि अबू उबैदाशी ऑनलाइन निकाहही केल्याचा आरोप आहे. ती पाकिस्तानमध्ये जाऊन त्याच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करत होती, असेही चौकशीत समोर आले आहे.

एटीएसचे पोलीस अधीक्षक मनीष त्रिपाठी यांनी सांगितले की, आरोपी महिला व्हॉट्सअॅपसह इतर इंटरनेट माध्यमांद्वारे दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होती. चौकशी आणि तपासात ती जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात नोंदवलेल्या अहवालानुसार, पाकिस्तानी हँडलर्सनी तिला सौदी अरेबिया किंवा संयुक्त अरब अमिरातीमार्गे पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी ती पासपोर्ट बनवण्याचाही प्रयत्न करत होती.

चौकशीदरम्यान देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल खदीजाला कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले जाते. तिला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा मोबाईल तपासासाठी पाठवण्यात आला असून प्राथमिक तपासात एटीएसला त्यामध्ये अनेक संशयास्पद पाकिस्तानी मोबाईल क्रमांक जतन केलेले आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech