रायगड : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी निमित्त किल्ले रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “रायगड हा केवळ दगड-धोंड्यांचा किल्ला नसून तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा कणा आहे. ३५३ वर्षांपूर्वी याच दिवशी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते केवळ सिंहासनावरच नव्हे, तर रयतेच्या काळजावर विराजमान झाले,” असे शिंदे म्हणाले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला “जय भवानी, जय शिवाजी”चा जयघोष करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी-कोटी वंदन केले. ३५३ वर्षांपूर्वी झालेल्या राज्याभिषेकाचा आनंद, उत्साह आणि ऐतिहासिक महत्त्व आजही प्रत्येक शिवभक्ताच्या मनात तितकेच जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले. शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची परंपरा सुरू केली. पुढे शिवभक्तांच्या सहभागातून हा सोहळा अधिक व्यापक झाला आणि महाराष्ट्र शासनाने त्याला राज्यमान्यता दिली. त्यामुळे हा सोहळा आता महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा उत्सव बनला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते. त्यांनी स्वराज्याची स्थापना करून प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. संयम, शौर्य, दूरदृष्टी, युद्धनीती, गनिमी कावा आणि न्यायप्रिय शासन यांचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. त्यामुळे आजही महाराजांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
राज्य सरकारही शिवरायांच्या लोककल्याणाच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत असल्याचे सांगताना त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख केला. “प्रजा सुखी असावी, हा शिवरायांचा विचार होता. त्याच भावनेतून महिलांच्या सन्मानासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे,” असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमून गेला.