राम मंदिर प्रकरण : चंपत राय आणि मिश्राच्या राजीनाम्यावर बैठकीत निर्णय

0

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी दिली माहिती

लखनऊ : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्यांशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपत राय आणि न्यासी अनिल मिश्रा यांनी आपल्या पदांचे राजीनामे सादर केले आहेत. न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. स्वामी गोविंददेव गिरी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे न्यासाला मोठा धक्का बसला असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून रामभक्तांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी न्यास कटिबद्ध आहे.

प्राप्त झालेल्या राजीनाम्यांवर आगामी न्यास बैठकीत विचार करण्यात येणार आहे.रामभक्तांनी चांदीच्या विटा, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू श्रीरामांच्या सेवेसाठी न्यासाकडे सुपूर्द केल्या असून त्या सर्व वस्तू सुरक्षित असून त्यांची संपूर्ण नोंद उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मंदिरातील दानपेट्यांमधून मिळालेल्या रकमेबाबतच्या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अंतरिम अहवालाच्या आधारे न्यासाने एफआयआर दाखल केली असून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या संपूर्ण वादाचा गैरफायदा घेत काही समाजविघातक आणि स्वार्थी प्रवृत्ती सनातन धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech