नवी दिल्ली : कराचीतील अलीकडील स्फोटप्रकरणी पाकिस्तानने भारतावर केलेले आरोप भारताने ठामपणे फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानला खरमरीत शब्दांत सुनावत, इतरांवर आरोप करण्याऐवजी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. रणधीर जयस्वाल म्हणाले की, कराचीतील घटनेबाबत पाकिस्तानने भारतावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. इतरांवर बोट दाखवण्याऐवजी पाकिस्तानने स्वतःच्या देशातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे. आपल्या भूमीवर कार्यरत असलेल्या दहशतवादी नेटवर्कविरोधात विश्वासार्ह आणि ठोस कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच, दहशतवादाचा राज्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून वापर करण्याची प्रवृत्ती पाकिस्तानने तातडीने सोडावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कराची शहरातील सिंध रेंजर्सच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान लष्कराच्या माध्यम शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) ने या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार ठरवले होते. पाकिस्तानने बंदी घातलेल्या जमात-उल-अहरार या संघटनेला ‘भारत समर्थित संघटना’ असल्याचा आरोप करत भारतावर बिनबुडाचे आरोप केले. याशिवाय, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही भारतावर संपूर्ण प्रदेशात अशा गटांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला, जे पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणतात.
शनिवारी उशिरा रात्री कराचीतील पाकिस्तान रेंजर्स (सिंध) च्या गुलिस्तान-ए-जौहर छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार सुरक्षा जवान आणि सहा सशस्त्र हल्लेखोर ठार झाले. या कारवाईदरम्यान एक जखमी हल्लेखोर जिवंत पकडण्यात आला. पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) ने रविवारी जारी केलेल्या निवेदनात, हा हल्ला जमात-उल-अहरारशी संबंधित दहशतवाद्यांनी केल्याचा दावा केला.