
नवी दिल्ली : सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य राजकीय स्वागत करण्यात आले. स्टेट हाऊसमध्ये त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला. यावेळी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी उपस्थित होते.पंतप्रधान मोदी हे सेशेल्सच्या सुवर्णमहोत्सवी राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सेशेल्स दौऱ्यावर आहेत. सेशेल्स सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा सर्वोच्च सन्मान बहाल केला. ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ म्हणजे ‘निळ्या क्षितिजाचे संरक्षक’. समुद्र, सागरी पर्यावरण, हवामान संरक्षण आणि सागरी संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नेत्यांना किंवा व्यक्तींना हा विशेष सन्मान दिला जातो. महासागर हे सेशेल्ससारख्या बेटराष्ट्राचे जीवनाधार असल्याने हा सन्मान त्या देशासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
सागरी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्न, ब्लू इकॉनॉमीला दिलेली चालना, हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा व सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी केलेले कार्य तसेच हवामान बदलासंदर्भातील जागतिक उपक्रमांमध्ये भारताने बजावलेली सक्रिय भूमिका यांचा गौरव म्हणून सेशेल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा सन्मान प्रदान केला आहे. हा पुरस्कार भारत-सेशेल्समधील दृढ संबंध आणि पर्यावरण संवर्धनाबाबतच्या दोन्ही देशांच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक मानला जात आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-सेशेल्स संबंधांच्या सर्व महत्त्वाच्या पैलूंचा व्यापक आढावा घेतला. तसेच परस्पर हिताशी संबंधित प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.तीन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी सेशेल्समध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांनी स्टेट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत केले. त्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांदरम्यान उच्चस्तरीय चर्चा पार पडली.
राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून सेशेल्स दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. याशिवाय ते सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील आणि तेथील भारतीय समुदायाशी संवादही साधतील. भारत आणि सेशेल्स यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देशांतील भागीदारी ही समान इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि जनतेमधील दृढ संबंधांवर आधारित आहे. द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.
हिंद महासागरातील महत्त्वाचा सागरी शेजारी देश म्हणून सेशेल्स हा भारताच्या ‘व्हिजन महासागर’ या उपक्रमाचा तसेच ‘ग्लोबल साऊथ’ प्रति भारताच्या वचनबद्धतेचा महत्त्वाचा भागीदार मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा भारत-सेशेल्समधील सामरिक संबंधांना नवी दिशा देणारा ठरणार असून, हिंद महासागर क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.