नवी दिल्ली : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने चार धाम यात्रा २०२६ च्या पहिल्या टप्प्यासाठी हेलिकॉप्टरचे यशस्वी आणि सुरक्षित कार्यान्वयन पूर्ण केले आहे. यातून, यात्रेकरूंना निर्वेध आणि विश्वासार्ह हवाई वाहतूक सुविधा देण्याविषयीची सरकारची दृढ कटिबद्धता दिसून आली आहे. चार धाम यात्रेचा पहिला टप्पा एप्रिल २०२६ मध्ये सुरू झाला, त्याचवेळी हेलिकॉप्टर कार्यान्वयनाची सुरुवात झाली आणि २६ जून २०२६ पर्यंत ही सेवा सुरू राहिली. या काळात, हेलिकॉप्टरच्या दररोज सुमारे ४०० फेऱ्या झाल्या. सुमारे १२,०३२ इतक्या शटल सेवांमधून ६७,०६४ यात्रेकरूंना ही सुविधा देण्यात आली. त्याशिवाय, ११,७१५ यात्रेकरूंसाठी २,०६५ चार्टर सेवाही देण्यात आल्या. याद्वारे, भाविकांना संपूर्ण चार धाम क्षेत्रात, सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रभावी विमान सेवा देण्यात आल्या.
या संपूर्ण सेवेच्या यशस्वी कार्यान्वयनाविषयी माहिती देतांना, नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सरकारने चार धाम यात्रेच्या सर्व यात्रेकरूंना विशेष प्राधान्य दिले आलं असून त्यांना सुलभ, सहज आणि सुरक्षित प्रवास करता येईल, हे आमच्या सरकारने सुनिश्चित केले आहे. प्रत्येक यात्रेकरूला आपली ही पवित्र यात्रा सुरक्षितपणे आणि आत्मविश्वासाने पूर्ण करता येईल, ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वीच, डीजीसीए, हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि यूसीएडीए यांसारख्या सर्व संबंधित भागधारकांच्या समन्वयाने, विविध स्तरांवर सातत्यपूर्ण आढावे घेण्यात आले.” असे ते म्हणाले.
चारधाम हेलिकॉप्टर सेवा देशातील सर्वाधिक आव्हानात्मक विमानवाहतूक परिस्थितींमध्ये चालवली जाते. दुर्गम व खडतर भूभाग, झपाट्याने बदलणारी हवामानाची स्थिती, अरुंद दऱ्या, मर्यादित उड्डाण कालावधी आणि मोठ्या प्रमाणावरील हेलिकॉप्टर वाहतूक यांमुळे या सेवेसाठी अत्यंत उच्च दर्जाचे कार्यकारी नियोजन आणि नियामक देखरेख आवश्यक असते. हिमालयीन प्रदेशातील हेलिकॉप्टर सेवांशी संबंधित विशिष्ट कार्यात्मक आव्हाने लक्षात घेऊन, यंदाच्या यात्रेचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच मंत्रालयाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली. राम मोहन नायडू यांनी स्वतः कार्यकारी सज्जता आणि सुरक्षा तयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी अनेक उच्चस्तरीय आढावा बैठकींचे वैयक्तिकरित्या अध्यक्षस्थान भूषवले.