“TET” पेपरफुटीवरून राज्यातील राजकारण पेटले……….?

0

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर युवक काँग्रेसचा धडक एल्गार……!
‘पेपरचोर गद्दीछोड’, ‘ दादा भुसे राजीनामा द्या’च्या घोषणांनी परिसर दणाणला….

(अनंत नलावडे)

मुंबई : राज्यातील “TET”(शिक्षक प्रवेश) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेने आधीच संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण असताना या प्रकरणाला आता मोठे राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे सामान्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत करणाऱ्या या घटनेविरोधात रविवारी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक गनिमी काव्याने मुंबई युवक काँग्रेसने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन छेडत सरकारला थेट लक्ष्य केले. मंत्रालयासमोरिल शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर झालेल्या या आंदोलनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

यावेळी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.कडेकोट पोलीस बंदोबस्ताला चकवा देत आंदोलनकर्त्यांनी गनिमी काव्याने थेट शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यावरच धडक दिली. झीनत शबरीन यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवर “दादा भुसे राजीनामा द्या” असे पोस्टर फडकावले, तर “पेपरचोर गद्दीछोड”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी परिसरात घोषणाही रंगवून सरकार विरोधातील आपली तीव्र नाराजीही व्यक्त केली.

या वेळी बोलताना झीनत शबरीन यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोलही केला. “NEET नंतर आता TET परीक्षेचाही पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.वारंवार होणाऱ्या अशा पेपरफुटीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासच उडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या सरकारला नैतिकदृष्ट्या सत्तेवर राहण्याचा काडीमात्र अधिकार नसल्याने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी,” अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

या आंदोलनामुळे केवळ राजकीय वातावरण तापले नाही, तर राज्यातील एकूणच परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हते बाबतही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थी, पालक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये आधीच तीव्र संताप आहे.अशात वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतरही काही मोजक्या गैरप्रकारांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची भावनाही समाजात अधिक तीव्र होत आहे.त्यामुळे पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदे, पारदर्शक परीक्षा प्रणाली आणि दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी अधिक जोर धरू लागली आहे.

दरम्यान, आंदोलन अधिक तीव्र होत असताना पोलिसांनी झीनत शबरीन यांच्यासह अनेक युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि पेपरफुटीमागील दोषींना शिक्षा होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.त्यामुळे TET पेपरफुटीचा मुद्दा आता केवळ परीक्षा व्यवस्थेपुरता मर्यादित न राहता तो राज्यातील शिक्षण, प्रशासन आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech