सचिन अहिर ठाकरे कुटुंबीयांना धडा शिकवून शिंदे सेनेत निघून गेले. खरे म्हणजे सचिन अहिर यांचे राजकारण बारा वर्षांपूर्वी सुनील शिंदे या निष्ठावान शिवसैनिकाने संपवले होते. सचिन अहिर हे राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री असताना सुनील शिंदे यांनी वरळी मतदारसंघात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. सुनील शिंदे पंधरा वर्षे वरळीचे शाखाप्रमुख होते त्यानंतर ते नगरसेवक झाले. बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. अतिशय मृदू स्वभावाचे व जमिनीवरचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यामुळेच वरळीच्या जनतेने त्यांना २०१४ साली विधानसभेवर पाठवले. परंतु आदित्य ठाकरे यांना विधानसभेवर पाठवण्यासाठी २०१९ साली सुनील शिंदे यांचे तिकीट कापण्यात आले. आदित्य ठाकरे यांना निवडून येण्यासाठी कोणतीही रिस्क नको म्हणून पुढे सचिन अहिर यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. २०२२ साली अहिर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. अनेक निष्ठावंत शिवसैनिक शिवसैनिकांना डावलून अहिर यांना संधी देण्यात आली. फक्त परिषद नव्हे तर आदित्य ठाकरे यांचे ते अतिशय निकटवर्तीय झाले. त्यांना पुणे जिल्ह्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे संपर्क नेतेपद देण्यात आले. भारतीय कामगार सेना या शिवसेनेच्या मोठ्या संघटनेचे सरचिटणीस पद देण्यात आले. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष पद देण्यात आले. आशिष चेंबूरकर , सुनील शिंदे या निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून काल आलेल्या सचिन अहिर यांचे संघटनेतील महत्त्व वाढले. त्यामुळे वरळीमध्ये नाराजी होती. पण या नाराजीचे उट्टे शिवसैनिकांनी वरळीच्या विधानसभा निवडणुकीत काढले नाही. उलट त्यांनी प्रामाणिकपणे काम करून एकनाथ शिंदे यांचे मोठे आव्हान असताना आदित्य ठाकरे यांना वरळीतून २०२४ साली मोठ्या फरकाने निवडून आणले.
निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून सचिन अहिर यांना ठाकरे कुटुंबीयांच्या किचन कॅबिनेट मध्ये स्थान मिळाले. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर त्यांच्या भावाला बेस्ट समितीचे बिगर नगरसेवक सदस्य पद देण्यात आले. त्याचबरोबर दुसऱ्या भावाला प्रभाग समितीचे सदस्य पद देण्यात आले. ही पदे निष्ठावंत शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांना देता आली असती. परंतु निष्ठावंतांना डावलून आया रामांना संधी दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ही अवस्था झाली आहे.
गिरणी कामगार संघटनांमध्ये गॅंगवॉरचा प्रवेश झाला. त्याचवेळी सचिन अहिर यांचे राजकारण सुरू झाले. अरुण गवळी गॅंगला गप्प बसवण्यासाठी अरुण गवळीचा भाचा असलेल्या तरुण सचिन अहिर यांना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस पद देण्यात आले. तेथून सचिन अहिर यांचे राजकारण सुरू झाले. १९९९ साली काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय मिल मजदूर संघ शरद पवार यांना आपल्या ताब्यात ठेवायचा होता. त्यामुळे शरद पवार यांनी सचिन अहिर यांना जवळ केले. वरळी मतदारसंघातून तिकीट दिले. त्यानंतर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपदी दिले. त्यानंतर त्यांना गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची संधी दिली. परंतु साम दम दंड भेद असताना वरळीमधून सुनील शिंदे या सामान्य शिवसैनिकाने त्यांचा २७ हजार मतांनी पराभव केला. कोणत्याही दहशतीला न जुमानता वरळीतील निष्ठावंत शिवसैनिकांनी सुनील शिंदे यांना निवडून आणले. त्याचवेळी सचिन अहिर यांचे संसदीय राजकारण संपले होते. परंतु संपलेल्या विरोधकाला जिवंत करून उद्धव ठाकरे अर्थात त्यांच्या शिवसेनेने आपल्यावर संकट ओढवून घेतले. त्याचाच धडा नियतीने उद्धव ठाकरे -आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
सचिन अहिर यांच्या शिवसेनेच्या त्यागाने वरळीमध्ये फारसा फरक पडणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. सचिन अहिर यांना विधान परिषदेवर संधी दिल्यामुळेच त्यांना आता विधानपरिषद उपसभापती पद मिळाले आहे. राजकारणात आता नैतिकता राहिलेली नाही. पुढे आपल्याला शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी मिळणार नाही हे लक्षात आल्याने सचिन अहिर यांनी शिंदे सेनेकडे धाव घेतली आहे. यापुढे शिंदे सेना अहिर यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी देईलही. परंतु फुटीर म्हणून त्यांच्या वरचा डाग पुसला जाणार नाही. दुसऱ्या बाजूला पुन्हा उपसभापतीपद मिळावे म्हणून मूळ शिवसेना सोडणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची निराशा झाली आहे. शिंदे सेनेने त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी दिली मात्र उपसभापती पद काढून घेतले आहे. सचिन अहिर यांचा उपसभापती पदाचा फॉर्म भरताना डॉ.नीलम गोऱ्हे यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला पचका करतील असे त्यांना वाटले नव्हते.

– नितीन सावंत,
9820355612