महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढले..,…?

0

(अनंत नलावडे)

मुंबई : सध्या तरी महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू आता केवळ मंत्रालयापुरता मर्यादित राहिलेला नाही. दिल्लीतील सत्ताकेंद्रात भविष्यात कोणाचे वर्चस्व राहणार आणि त्याचे महाराष्ट्रावर काय परिणाम होणार, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना वेग आला आहे. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील वाढते राजकीय वजन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राष्ट्रीय नेतृत्वातील प्रभावी स्थान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेले संबंध आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोरील संघटनात्मक आव्हाने यामुळे २०२९ च्या सत्तासमीकरणांची रंगीत तालीम आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आता काही राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काही वर्षांत राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाच्या फेरबदलांच्या शक्यतांवरून अनेक चर्चा सुरू आहेत. त्या चर्चांचा महाराष्ट्रातील नेतृत्वावरही परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व चर्चा असून त्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा निर्णय झालेला नाही.तरीही राज्यातील प्रत्येक मोठ्या राजकीय घडामोडीकडे या संभाव्य बदलांच्या पार्श्वभूमीवर पाहिले जात असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेची मजबूत भागीदारी कायम ठेवली असून, केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे सुसंवादाचे संबंध कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.त्यामुळे जरी भविष्यात महाराष्ट्रातील सत्तेच्या नेतृत्वाबाबत नवी समीकरणे आकार घेऊ शकतात का, याची उत्सुकता वाढली आहे. तर,दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटन, प्रशासन आणि निवडणूक व्यवस्थापनावर मजबूत पकड निर्माण केल्याने राज्यातील भाजपमध्ये त्यांचे स्थान अधिक बळकट झाल्याचे मानले जाते.

महाविकास आघाडीतील प्रमुख चेहरा असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांच्यासमोर पक्षसंघटना टिकविणे, गळती रोखणे आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कायम ठेवणे ही मोठी राजकीय कसोटी ठरणार आहे. त्याचवेळी शिंदे गटाकडून शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांवर सुरू असलेली राजकीय मोहीम आणि भाजपची विस्ताराची रणनीती यामुळे राज्यातील विरोधी राजकारणासमोरही नवे आव्हान उभे राहिले आहे.

आता नुकत्याच झालेल्या व काही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि त्यानंतरची लोकसभा निवडणूक या सर्वांची रणनीती आता एकाच राजकीय पटावर आखली जात असल्याचेही जाणकारांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय हालचालीकडे दिल्लीतील नेतृत्वाच्या संभाव्य समीकरणांच्या नजरेतून पाहिले जात असून, पुढील काही वर्षांत राज्याच्या राजकारणात नवे मित्र, नवी आघाडी, नवे संघर्ष आणि अनपेक्षित राजकीय घडामोडी पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा वेगाने रंगत आहे.

एकूणच, २०२९ अजून दूर असले तरी त्या लढाईची राजकीय पेरणी महाराष्ट्रात आतापासूनच सुरू झाल्याचे चित्र आहे. दिल्लीतील नेतृत्वाच्या चर्चांपासून ते महाराष्ट्रातील सत्तेच्या भवितव्यापर्यंत प्रत्येक घडामोडीवर राजकीय पक्षांची बारकाईने नजर असून, बदलत्या सत्तासमीकरणांचा हा खेळ पुढील काळात अधिक रंगणार, अशीच सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech