‘विरोधी पक्षनेतेपद’ भरून काढण्याचा संकेत……..?

0

उपसभापती होताच सचिन अहिर यांचा पहिलाच राजकीय संदेश……!

(अनंत नलावडे)

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड होताच सचिन अहिर यांनी केवळ आभार प्रदर्शनावर न थांबता वर्षभरापासून रखडलेल्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा गुरुवारी थेट सभागृहात उपस्थित करून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.”विरोधी पक्षनेतेपद हा लोकशाहीचा कणा आहे; ते रिक्त राहिल्यामुळेच अनेक वाद निर्माण झाले,” असे स्पष्टपणे सांगत हा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याची घोषणा करून अहिर यांनी आपल्या नव्या राजकीय भूमिकेचा पहिलाच ठसा सभागृहात उमटवला.

महाविकास आघाडीने उमेदवार ज.मो. अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेतल्यानंतर अहिर यांची बिनविरोध निवड झाली.मात्र पदभार स्वीकारताच त्यांनी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न उपस्थित केल्याने हा केवळ संसदीय मुद्दा न राहता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील पुढील राजकीय समीकरणांचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे.

“हे पद वेळेत भरले असते तर इतके ‘रामायण’ घडले नसते,” असे परखड मत नोंदवत अहिर यांनी सरकारनेही निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.”मी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याबाबत शब्द टाकतो,” या एका वाक्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न आता प्रत्यक्ष निर्णयाच्या टप्प्यावर जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाल्यानंतर लगेचच घटनात्मक पदाची जबाबदारी मिळालेल्या सचिन अहिर यांनी, “कालपर्यंत मी विरोधी बाकावर होतो; त्यामुळे नाराजी स्वाभाविक आहे. मात्र उपसभापती म्हणून प्रत्येक सदस्याला समान न्याय आणि सन्मान देईन,” अशी भूमिका मांडत पक्षीय राजकारणापेक्षा संसदीय निष्पक्षतेचा संदेश देण्याचाही प्रयत्न केला.

अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जवळपास वर्षभर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर उपसभापती म्हणून पहिल्याच भाषणात सचिन अहिर यांनी हा मुद्दा ऐरणीवर आणल्याने, शिंदे-फडणवीस सरकार आता या प्रश्नावर पुढाकार घेणार का, विरोधकांची भूमिका काय असेल आणि विधान परिषदेतील राजकीय घडामोडींना कोणते नवे वळण मिळेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech