ठाकरेंनी मंगळवारी पुन्हा बोलावली आमदारांची बैठक

0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील खासदार आणि आमदारांच्या लागोपाठ होत असलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची पुन्हा एकदा तातडीची बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नुकतीच उद्धव ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या मोठ्या धक्क्यानंतर आता आणखी आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ही बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात या बैठकीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, ज्याने पक्षाला मोठा धक्का बसला होता. या खासदार फुटीनंतर आता एकनाथ शिंदे यांचे उर्वरित आमदार आणि नगरसेवक लक्ष्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अत्यंत सावध पावले टाकत आहेत. मंगळवारी संध्याकाळी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीत अनेक संवेदनशील आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. खासदारांचा फुटीनंतर आमदारांच्या फुटीबाबत सुरू असलेल्या चर्चा, पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आणि आमदारांची विधिमंडळातील कामगिरी, सत्ताधारी भाजपा-शिंदे यांच्या विरोधातील रणनीती आदींबाबत चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

या बैठकीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे की, आमदारांची बैठक वारंवार त्यांनी बोलवली पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. जर त्यांची काम करता आले तर ती केली पाहिजेत. पण बैठक बोलावून जर तुम्ही त्यांना दम देणार असाल तर ते आमदार तुमच्याकडे टिकणार नाहीत हे सत्य आहे. आमदारांना तुमची हुकूमशाही नको लोकशाही मार्गाने त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता पाहिजे आहे, आणि हे प्रश्न सोडवणारा नेता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आहेत, हे सर्वजण जाणतात म्हणून भविष्यात काय होईल ते आता सांगणं उचित नाही, असं यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वरळीतून लढण्याचा आदेश मिळाला तर निवडणूक लढेल असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे, त्यावर देखील आता संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सचिन अहिर यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ते एकनाथ शिंदे साहेब घेतील, सचिन अहिर वरळीमध्ये लोकप्रतिनिधी होते, त्यांचे काम करण्याची पद्धत लोकांना माहीत आहे. ते गेले तीस वर्ष विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये आहेत. त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत कसा आणि कुठे घ्यायचा? याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. वरळीच्या सातबाऱ्यावर कोणाचं नाव नाही, असंही सचिन अहिर यांनी म्हटलं होतं, त्यावर देखील संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सचिन अहिर यांनी हे जे वक्तव्य केलं आहे याला मॅच्युरिटी म्हणतात, त्यांनी सांगितलं की वरळीच्या सातबाराऱ्यावर कोणाचं नाव नाही, असं यावेळी शिरसाट यांनी म्हटलं आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech