मुंबईसह राज्यात पावसाचा कहर; अनेक भाग जलमय, धरणांमधील पाणीसाठ्यात काहिशी वाढ

0

७ जुलैपर्यंत अलर्ट जारी, झाडं पडून अंबानींचा ताफाही काही काळ थांबला

मुंबई : मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला असून पुढचे चार दिवस ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ७ तारखेपर्यंत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार सुरू राहणार आहे. हवामान विभागाने पुढच्या तीन दिवसांसाठी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. दादरमधील शिवसेना भवन समोरील मार्गावर झाडं पडले. तसेच वांद्रे येथे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर झाड पडले. त्यामुळे काही काळ ताफा थांबवावा लागला. कालांतराने रस्ता मोकळा झाल्यावर ताफा पुढे मार्गस्थ झाला.

मुंबई उपनगरातील कुर्ला कमानी येथील गोम्स टाऊन इमारतीजवळ असणा-या दुकानावर झाड पडून त्यात युनुस कुंडावाला, वय ६३ वर्षे यांचा मृत्यू झाल्याचे फौजिया रुग्णालयातून कळविण्या‍त आले आहे. मुंबईतील पावसामुळे रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेनच्या बोगदा खोदण्याच्या कामाचा औपचारिक शुभारंभ पुढे ढकलला आहे. हवामानामुळे रेल्वे मंत्रालयाने बुलेट ट्रेनच्या बोगदा खोदकामाच्या शुभारंभास विलंब केला आहे, परंतु प्रकल्पाला होणारा विलंब टाळण्यासाठी तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

अतिमुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने अनेक मार्ग बंद झाले होते. ज्यात अंधेरीमध्ये अंधेरी सब वे, वीरा देसाई मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग बंद झाले होते. चेंबूर येथील नूर ए इलाही सर्विस रोडवर पाणी साचले होते. विक्रोळीत हुमा मॉल जंक्शन आणि गांधीनगर जंक्शन, यासारख्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती. एकूणच अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech