तेहरान : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणची राजधानी तेहरान येथे केलेल्या हल्ल्यात इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. सध्या तेहरानमध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराचे कार्यक्रम सुरू असून, आज (९ जुलै) त्यांना दफन करण्यात येणार आहे.दरम्यान, इराणने तेहरानमधील नुकसानीचे पहिले अधिकृत दृश्यफीत (फुटेज) जारी केले आहे.
या जारी केलेल्या ३५ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये अली खामेनेई यांचे निवासस्थान असलेल्या इमाम खुमैनी हुसेनिया सभागृहात मोठ्या प्रमाणावर झालेली हानी आणि ढिगारा स्पष्टपणे दिसून येत आहे. खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच हे दृश्यफीत प्रसिद्ध करण्यात आले आहे. अली खामेनेई यांना आज ईशान्य इराणमधील त्यांच्या मूळ गावी मशहद येथे दफन करण्यात येणार आहे. यासह तेहरान, कोम तसेच इराकमधील पवित्र शिया धार्मिक शहरे नजफ आणि कर्बला येथे आयोजित करण्यात आलेल्या अंत्ययात्रांचा समारोप होणार आहे.यापूर्वी अली खामेनेई यांचे पार्थिव तेहरानमधील ग्रँड मोसल्ला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेहरान आणि कोमच्या रस्त्यांवरून अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणवर नव्याने हवाई हल्ले केले आहेत.त्यानंतर गुरुवारी पहाटे कुवेत, बहरीन आणि कतारमध्ये इराणी हल्ल्याचा इशारा देणारे क्षेपणास्त्र सतर्कता सायरन वाजू लागले. मात्र, या तिन्ही देशांमध्ये कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमेरिकेच्या मते, मंगळवारी सामुद्रधुनीतून जात असलेल्या तीन मालवाहू जहाजांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. या नव्या हल्ल्यांच्या मालिकेमुळे इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील अनेक शहरे हादरली असून, काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाला आहे.