इराण-अमेरिका तणावाचा परिणाम; भारतात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

0

मुंबई : इराण-अमेरिका यांच्यात वाढत असलेला तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून आला आहे. आज देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 43 हजार 890 रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 23 हजार रुपये इतका खाली आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिका शांतता करार पूर्णपणे संपुष्टात आल्याचे वक्तव्य केल्यानंतर मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव पुन्हा वाढला आहे. या घडामोडींचा थेट परिणाम जागतिक कमोडिटी बाजारासह भारतीय सराफा बाजारावरही झाला आहे.सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये झालेल्या या अचानक घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय कॉमेक्स बाजारात सोन्याच्या दरात सुमारे 0.37 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली असून, ते सुमारे 4,067 डॉलर प्रति औंस दरावर व्यवहार करत आहे. चांदीच्या किमतीतही 0.85 टक्क्यांची घसरण झाली असून ती 58.045 डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत आहे.

देशांतर्गत एमसीएक्स बाजारातही सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1.43 ते 1.44 लाख रुपये या पातळीवर व्यवहार करताना दिसले. त्याचप्रमाणे चांदीचे दर प्रति किलो 2.23 ते 2.25 लाख रुपये दरम्यान राहिले असून, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत त्यात लक्षणीय घसरण झाली हे.दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या ताज्या एफओएमसी बैठकीतील नोंदीनुसार महागाई अद्याप दोन टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा अधिक असल्याने व्याजदर कपातीची घाई केली जाणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास व्याजदर दीर्घकाळ उच्च पातळीवर ठेवण्याची भूमिका फेडने स्पष्ट केली आहे. मात्र, महागाई सातत्याने कमी होत अर्थव्यवस्थेची गती मंदावल्यास भविष्यात व्याजदर कपातीचा विचार केला जाऊ शकतो, असेही बैठकीत नमूद करण्यात आले आहे.

व्याजदर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीतील गुंतवणूक कमी करून सरकारी रोख्यांकडे (बाँड्स) मोर्चा वळविला आहे. त्यामुळे मौल्यवान धातूंची मागणी घटली असून त्यांच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे.

इराण-अमेरिका तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिकन फेडकडून व्याजदर वाढीची शक्यता या सर्व घटकांमुळे भारतीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech