“जनतेचा आवाज दाबण्याऐवजी संवाद साधा, जबाबदारी निश्चित करा” – अण्णा हजारे

0

अहिल्यानगर : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाई आणि लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केले आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज दाबण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि जबाबदारी निश्चित करणे हीच सुशासनाची खरी ओळख असल्याचे त्यांनी म्हटले.

अहिल्यानगर येथे गुरुवारी अण्णा हजारे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 2 तासांचे मौन आंदोलन केले. त्यानंतर ते आपल्या राळेगण सिद्धी या गावी रवाना झाले.यापूर्वी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी झालेला हिंसाचार आणि पोलिसांची कारवाई अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. लोकशाहीत संघर्ष नव्हे, तर संवाद हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. पत्रात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, एखाद्या मंत्र्याची जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा घेतल्याने सरकार कमकुवत होत नाही. उलट संपूर्ण मंत्रिमंडळाला जबाबदारीचे स्पष्ट भान मिळते आणि शासन व्यवस्था अधिक उत्तरदायी बनते.

देशातील लाखो तरुण पेपरफुटी, भरती परीक्षांमधील विलंब आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. या प्रश्नांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय म्हणून न पाहता, जनतेच्या वास्तविक चिंतेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले. कोणतीही गडबड किंवा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेकदा जबाबदारी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर ढकलली जाते; मात्र प्रत्यक्षात उच्च पदावरील अधिकाऱ्यांची आणि संबंधित जबाबदार व्यक्तींची उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech