राजकीय वर्तुळात चर्चा : श्रीकांत शिंदेंना मिळणार केंद्रात मंत्रीपद

0

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांना राज्यमंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असून, ते कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचा दावा सूत्रांनी केला. गेल्या काही दिवसात श्रीकांत शिंदे यांचे राजकीय महत्त्व वाढले आहे. महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन टायगर’मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मोहिमेदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (उबाठा-गट) ६ लोकसभा खासदारांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे लोकसभेतील शिंदे गटाची ताकद वाढून १३ खासदारांपर्यंत पोहोचली.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट-यूजी परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात झालेल्या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलाय.

श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवल्यामुळे शिंदे यांना शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान रवनीत सिंग बिट्टू यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बिट्टू यांच्याकडे पंजाबची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याने त्यांनी हे पद सोडल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. तसेच बिट्टू यांच्याऐवजी आता केंद्रीय राज्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदेंची नियुक्ती होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech