नवी दिल्ली : कारगिल विजय दिनानिमित्त कृतज्ञ राष्ट्र आज वीर जवानांना अभिवादन करत आहे. यावर्षीचा मुख्य कार्यक्रम नवी दिल्लीऐवजी लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी आपल्या एक्स पोस्टद्वारे भारतीय सशस्त्र दलांच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. या दिवसाच्या पूर्वसंध्येला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शत्रूचे छक्के सोडवणाऱ्या भारतीय सैन्याच्या शूर जवानांना द्रास येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत एक्स हँडलवर राष्ट्रपती मुर्मू यांनी आज सकाळी लिहिले, “कारगिल विजय दिनानिमित्त मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर योद्ध्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करते. त्यांचे अद्वितीय शौर्य, अढळ निर्धार आणि अनन्य राष्ट्रभक्ती ही आपल्या सैन्याच्या गौरवशाली परंपरेची अप्रतिम उदाहरणे आहेत. देश सदैव त्यांचा ऋणी राहील. आपल्या त्या पराक्रमी वीरांची शौर्यगाथा भावी पिढ्यांना राष्ट्रसेवा आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर सतत प्रेरणा देत राहील.”
उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी लिहिले, “कारगिल विजय दिनानिमित्त देश भारतीय सशस्त्र दलांच्या त्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांच्या असामान्य धैर्य, अटळ निर्धार आणि सर्वोच्च बलिदानामुळे कारगिल युद्धात भारताला ऐतिहासिक विजय मिळाला आणि आपल्या देशाची सार्वभौमता व प्रादेशिक अखंडता अबाधित राहिली. हा विजय भारताच्या लष्करी सामर्थ्याचा, राष्ट्रीय एकतेचा आणि मातृभूमीच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करण्याच्या अढळ संकल्पाचा पुरावा आहे. देश आपल्या शूर सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सदैव ऋणी राहील. जय हिंद.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले, “कारगिल विजय दिनानिमित्त संपूर्ण देश भारताच्या सुरक्षेसाठी शूर सैनिकांनी दाखवलेल्या असामान्य धैर्य आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांचे अदम्य धैर्य नेहमीच राष्ट्रीय अभिमानाचे स्रोत राहील. त्यांची अटळ देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लिहिले, “कारगिल विजय दिन हा भारतीय सैन्याच्या अदम्य शौर्य आणि अद्वितीय पराक्रमाचे प्रतीक आहे. सन १९९९ मध्ये हिमालयातील दुर्गम बर्फाच्छादित शिखरांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि उंचावरील शत्रूच्या मोर्चांनाही न जुमानता आपल्या वीर जवानांनी ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून शत्रूला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. कारगिल विजय दिनानिमित्त देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या त्या सर्व वीर सपूतांचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करतो.”