मोदींच्या भेटीनंतर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये बैठक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी खासदार प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २२ जुलै रोजी झालेल्या भेटीत शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच इतर जनहिताच्या विषयांवर चर्चा झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले होते. मात्र, या भेटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाबाबतही चर्चा झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे तासभर चालल्याचे सांगितले जात असून, या भेटीमुळे दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या वाढत्या भेटीगाठींमुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा अधूनमधून रंगत आहेत. काही नेत्यांच्या बैठका झाल्याचेही बोलले जात असले, तरी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घडामोडींकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत या चर्चांना ठोस दिशा मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.