नवी दिल्ली : आसाममधील भीषण पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राज्यातील खासदारांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकार आसाम सरकारसोबत समन्वयाने काम करत असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी लिहिले, “आसाममधील खासदारांची भेट घेऊन राज्यातील विविध भागांतील सध्याच्या पूरस्थितीवर चर्चा केली. केंद्र सरकार प्रभावित नागरिकांच्या मदतीसाठी आसाम सरकारसोबत एकत्रितपणे कार्यरत आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि मंगलमय जीवनासाठी मी प्रार्थना करतो.”
दरम्यान, आसामच्या शिवसागर जिल्ह्यातील पूरस्थिती सतत गंभीर होत आहे. नौजान गावात पुराचे पाणी घरांमध्ये शिरले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शेकडो कुटुंबांना निवारा, अन्न आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मदत व बचावकार्याला वेग देण्यात आला आहे. याच दरम्यान, आसाममधील आमदारांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रायजोर दल वगळता सर्व आमदारांनी पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी आपल्या एका महिन्याचा पगार दान करण्याची घोषणा केली आहे. विधानसभा अध्यक्ष रणजीत कुमार दास यांनी सांगितले की, ते आणि उपाध्यक्ष हब्बे टेरोन पूरनिवारणासाठी आपल्या एका महिन्याचा पगार दान करणार आहेत. त्यांनी पुढे जाहीर केले, “आमच्याशिवाय विधानसभा सचिवालयातील सर्व कर्मचारीदेखील पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी आपल्या एका दिवसाचा पगार दान करतील.”
या उपक्रमाचे स्वागत करत संसदीय कार्यमंत्री पीयूष हजारिका यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदारही आपल्या एका महिन्याचा पगार दान करणार आहेत. राज्यातील तृणमूल काँग्रेसचे एकमेव आमदार शेरमन अली अहमद यांनीदेखील पूरग्रस्त भागांसाठी आपल्या एका महिन्याचा पगार देण्याची घोषणा केली.
भारतीय वायुसेनेकडून आसाम आणि नागालँडमधील पूरग्रस्त भागांमध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रतिकूल हवामान आणि कठीण परिस्थिती असूनही वायुसेना मदत व बचावकार्यात पूर्ण तत्परतेने कार्यरत आहे. मंगळवारी भारतीय वायुसेनेने माहिती दिली की, गेल्या दहा दिवसांत त्यांच्या हेलिकॉप्टरांच्या मदतीने पुरात अडकलेल्या ४५८ नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
वायुसेनेच्या माहितीनुसार, आतापर्यंत हवाई मार्गाने ९ टनांहून अधिक अत्यावश्यक मदतसामग्री प्रभावित भागांमध्ये पोहोचवण्यात आली आहे. वायुसेनेचे अधिकारी आणि जवान दुर्गम तसेच पाण्याखाली गेलेल्या भागांमध्ये हेलिकॉप्टरद्वारे सतत मदतकार्य करत आहेत. सध्या एकूण ६३१ गावे अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत. तसेच, १८४ मदतछावण्या आणि वितरण केंद्रांमार्फत मदतकार्य सुरू असून सुमारे २८,७०० नागरिकांना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे.