पाकिस्तानात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत ९ पोलिसांचा मृत्यू, १५ दहशतवादी ठार

0

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात राबविण्यात आलेल्या एका सुरक्षा मोहिमेत नऊ सुरक्षा अधिकारी आणि १५ दहशतवादी ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. ही माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. ही मोहीम अस्थिर खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हांगू जिल्ह्यात बुधवारी एका पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल सुरू करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, हांगूमधील पोलीस चौकीवरील हल्ल्यानंतर मदतीसाठी अतिरिक्त सुरक्षा दल पाठविण्यात आले. मात्र, अतिरिक्त कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनावरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

पोलिस प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, या मोहिमेदरम्यान नऊ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत १५ दहशतवादी ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री सुहैल आफ्रिदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून घटनेचा सविस्तर अहवाल मागविला आहे. त्यांनी शहीद पोलीस अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने आणि योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मोहिमेदरम्यान मृत्यू झालेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत आणि आर्थिक सहाय्य देण्याचेही आदेश दिले आहेत.

खैबर पख्तूनख्वा प्रांतात अनेक वर्षांपासून अतिरेकी हिंसाचार, अफगाणिस्तानमधून सीमापार होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि वारंवार होणाऱ्या लष्करी कारवायांमुळे अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये युद्धविराम करार संपुष्टात आल्यानंतर, अफगाणिस्तान सीमेलगतच्या या प्रांतात दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप पाकिस्तानचे केंद्र सरकार बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेवर करत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech