दिसपुर : अप्पर आसाममधील चार जिल्हे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. याच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकार प्रभावितांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सातत्याने पावले उचलत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रभावितांसाठी आर्थिक मदतीसह मृतांच्या नातेवाईकांना ९ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, शिवसागर जिल्ह्यातील नाजिरा परिसरातील अजूनही सात जण बेपत्ता आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, बेपत्ता व्यक्तींचा शोध लागला नाही तर सरकार त्यांना मृत घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत उपलब्ध करून देईल.
पुराचे पाणी सातत्याने ओसरत असून त्यामुळे घरे आणि शाळांमध्ये गुडघ्यापर्यंत चिखल व गाळ साचल्याने नागरिकांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. लोक आपल्या घरी परतण्याचा प्रयत्न करत असले तरी परिस्थिती गंभीर असल्याने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याकडे त्यांचा कल आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) २८ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, शिवसागर जिल्ह्यात आणखी सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. राज्यातील मृतांचा एकूण आकडा आता ७५ वर पोहोचला आहे. धनसिरी (नुमालीगड) नदी अजूनही धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत आहे. सरकार युद्धपातळीवर मदत व बचावकार्य करण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करत आहे.
सध्या पुरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शिवसागर, गोलाघाट, चराईदेव, जोरहाट, नगाव, शोणितपूर आणि कामरूप (मेट्रो) या जिल्ह्यांचा समावेश आहे. पुरामुळे या सात जिल्ह्यांतील २१ महसूल मंडळांतील एकूण ६२२ गावे प्रभावित झाली आहेत. राज्यातील एकूण ३,३२,६३९ लोकसंख्या आणि ४५,३४१.९८ हेक्टर शेतीक्षेत्र पाण्याखाली आहे. पुरग्रस्तांसाठी एकूण ८१ मदत छावण्या आणि ३४ मदत वितरण केंद्रांसह एकूण ११५ केंद्रे कार्यरत आहेत. मदत छावण्यांमध्ये ३२,४७७ लोकांनी आश्रय घेतला असून, मदत वितरण केंद्रांमधून १६,३१४ छावणीबाहेरील नागरिकांना मदत दिली जात आहे.
२८ जुलैपर्यंत शिवसागर जिल्ह्यात पुरामुळे पूर्णपणे नुकसान झालेल्या कच्च्या घरांची संख्या १८६ इतकी नोंदविण्यात आली आहे. शिवसागर जिल्ह्यातच दोन पक्की घरेही नुकसानग्रस्त झाली आहेत. तसेच, या जिल्ह्यात अंशतः नुकसान झालेल्या कच्च्या घरांची संख्या ५६० असून, अंशतः नुकसान झालेल्या पक्क्या घरांची संख्या ५८० आहे. याशिवाय, शिवसागर जिल्ह्यात ३२० झोपड्या आणि ७८९ जनावरांच्या शेडचे नुकसान झाले आहे.
पुरातील मदत व बचावकार्यामध्ये एसडीआरएफ, सेना/अर्धसैनिक दल, एनडीआरएफ, डीडीआरएफ, हवाई दल, पोलीस, अग्निशमन व आपत्कालीन सेवा (एफ अँड ईएस), सर्कल कार्यालय/स्थानिक प्रशासन, नागरी संरक्षण, प्रशिक्षित स्वयंसेवक आणि अग्निशमन विभाग सहभागी झाले आहेत. दरम्यान, पुरग्रस्त भागात राज्य सरकारने एकूण १२५ वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. या काळात २१ बोटीही मदतकार्यात कार्यरत होत्या. बोटींच्या माध्यमातून एकूण दोन जणांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.