नवी दिल्ली : प्रश्नपत्रिका फुटी, विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई आणि पेलेट गनच्या कथित वापराच्या निषेधार्थ विरोधी पक्ष इंडी आघाडीने संसद भवन परिसरात आंदोलन केले. आंदोलनादरम्यान, विरोधी खासदारांनी घोषणाबाजी केली आणि निषेधार्थ मोठे फलक झळकावले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल, धर्मेंद्र यादव, संजय राऊत आणि किशोरीलाल शर्मा यांच्यासह अनेक विरोधी खासदार या आंदोलनात उपस्थित होते. विरोधी नेत्यांनी जोरदार घोषणाबाजहीी केली आणि “आदेश कोणी दिला?” असे लिहिलेला एक मोठा फलक झळकावला.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, गृहमंत्री अमित शाह राष्ट्राला आणखी किती काळ उत्तर देणार नाहीत. गृहमंत्री संसदेत अनुपस्थित असून, विरोधी खासदार संसद भवनाच्या मकर द्वारात आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांवर पेलेट गनने गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्यापासून का रोखण्यात आले, यावर स्पष्ट उत्तर विरोधी पक्षांनी मागितले आहे. विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई आणि पेलेट गनचा वापर गंभीर असून सरकारने त्याचे उत्तर दिले पाहिजे, असे विरोधी पक्षाच्या खासदारांनी म्हटले आहे. सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.