ग्लासगो : भारताचा स्टार वेटलिफ्टर लवप्रीत सिंह याने राष्ट्रकुल क्रीडा २०२६ मध्ये पुरुषांच्या +११० किलो सुपर हेवीवेट गटात शानदार कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावावर केले. स्कॉटिश इव्हेंट कॅम्पसमध्ये गुरुवारी झालेल्या या रोमांचक स्पर्धेत लवप्रीतने एकूण 388 किलो (स्नॅच १७६ किलो + क्लीन अँड जर्क २१२ किलो) वजन उचलले. न्यूझीलंडच्या डेविड अँड्र्यू लिटी याने एकूण ३८९ किलो वजन उचलत केवळ एका किलोच्या फरकाने सुवर्णपदक जिंकले.
२८ वर्षीय लवप्रीतने २०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १०९ किलो गटात कांस्यपदक जिंकले होते. यावेळी सुपर हेवीवेट गटात तो आणखी दमदार अंदाजात दिसला. त्याने स्नॅचमधील तिन्ही प्रयत्न यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रथम १६८ किलो, त्यानंतर १७३ किलो आणि अखेरीस १७६ किलो वजन उचलत त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा नवा विक्रमही आपल्या नावावर केला. स्पर्धेतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट तेव्हा आला,जेव्हा सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार समोआचा सनेले माओ हा स्नॅचमध्ये १७५ किलोचे तिन्ही प्रयत्न करण्यात अपयशी ठरला आणि स्पर्धेबाहेर झाला. याचा पूर्ण फायदा लवप्रीतने घेतला आणि १७६ किलोचा यशस्वी प्रयत्न करत स्नॅचनंतर १० किलोची आघाडी मिळवली.
मात्र, क्लीन अँड जर्कमध्ये संपूर्ण चित्र बदलले. लवप्रीतने २१२ किलोचा यशस्वी प्रयत्न केला, पण २१७ किलो उचलण्यात तो अपयशी ठरला. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या डेविड लिटीने २२३ किलो वजन उचलत क्लीन अँड जर्कचा नवा स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला आणि एकूण ३८९ किलोसह सुवर्णपदकावर कब्जा केला. त्यानंतर त्याने तिसरा प्रयत्न केला नाही. सुवर्णपदक लवप्रीतच्या केवळ एका किलोने हुकले असले, तरी त्याची कामगिरी अत्यंत शानदार राहिली. बर्मिंगहॅम २०२२ मधील कांस्यपदकानंतर यावेळी त्याने रौप्यपदक जिंकत भारतीय वेटलिफ्टिंग मोहिमेचा शानदार समारोप केला आणि अखेरपर्यंत सुवर्णपदकासाठी कडवी झुंज दिली.