‘सौभाग्यवती वृंदा मोहन’च्या सेटवर रंगते रिल्सची आणि मैत्रीची मैफिल

0

मुंबई : सिनेसृष्टीत अनेक कलाकारांची मैत्री मालिकेच्या सेटवर सुरू होते आणि आयुष्यभर टिकून राहते. ‘सन मराठी’वरील ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेतही अशीच एक घट्ट मैत्री पाहायला मिळते. मालिकेत अभिमन्यूची भूमिका साकारणारा संग्राम समेळ आणि शशांकच्या भूमिकेत असलेला आशिष जोशी हे ऑनस्क्रीन जितके जवळचे दिसतात, तितकीच त्यांची ऑफस्क्रीन मैत्रीही गहिरी आहे. शूटिंगच्या फावल्या वेळात दोघे मिळून गाण्यांचे मजेशीर रिल्स बनवतात आणि त्यांच्या या व्हिडिओंना सोशल मीडियावरही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने संग्रामने या खास मैत्रीबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

संग्राम म्हणाला, “आशिष आणि माझी ओळख आजची नाही. आम्ही जवळपास दहा-बारा वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. ठाण्यात राहत असल्यामुळे चहाच्या टपरीवर किंवा एखाद्या आवडत्या खाऊच्या ठिकाणी आमच्या नेहमी भेटी व्हायच्या. त्या गप्पांमधून जुळलेली मैत्री आता ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’मुळे आणखी घट्ट झाली आहे. पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करत असल्यामुळे एकमेकांना अधिक जवळून ओळखण्याची संधी मिळाली. त्यामुळे सेटवर त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येते आणि वातावरण कायम खेळीमेळीचं राहतं.”

तो पुढे म्हणाला, “आशिष खूप मनमोकळा, उत्साही आणि सकारात्मक स्वभावाचा आहे. त्याच्यासोबत काम करताना प्रत्येक दिवस आनंदात जातो. तो छान गातो, त्यामुळे आम्ही गाण्यांचे रिल्स बनवायला सुरुवात केली. प्रेक्षकांनीही त्या रिल्सना खूप प्रेम दिलं. आता कोणतं गाणं करायचं, कोणता नवीन ट्रेंड ट्राय करायचा, यावर आमच्या सतत चर्चा सुरू असतात. आमच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी त्याच वेगळेपणामुळे आमची मैत्री अधिक खुलली आहे. ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ने आम्हाला केवळ सहकलाकार नाही, तर आयुष्यभरासाठी एक चांगला मित्र दिला आहे. ही मैत्री अशीच कायम टिकून राहो, हीच फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मनापासून इच्छा.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech