सीएसएमटी–सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस ट्रेन सुरु करण्यास मंजुरी

0

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि कोकण विभागातील प्रवासी संपर्क सुविधेला मोठी चालना देत भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ५१० किलोमीटरच्या या मार्गावर सुरू होणारी ही सेवा पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना थेट, सोयीस्कर आणि विश्वासार्ह रेल्वे सेवा उपलब्ध करून देणार आहे. ही प्रस्तावित रेल्वे गाडी दररोज गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि १५०८८ सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे.

कोकण विभागात व्यापक रेल्वे सेवा –
या नवीन दैनिक एक्स्प्रेसला पुढील स्थानकांवर व्यावसायिक थांबे असतील :
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरदा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणातील महत्त्वाची शहरे व जिल्हे यांच्यात अखंड रेल्वे संपर्क उपलब्ध होऊन कोकण किनारपट्टीपर्यंतची पोहोच अधिक सुलभ होणार आहे.

पर्यटन, अर्थव्यवस्था आणि प्रवासी सुविधांना चालना:
या नवीन सेवेच्या माध्यमातून मुंबई आणि दक्षिण कोकणमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे आणि निसर्ग पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, लघुउद्योजक आणि स्थानिक नागरिकांनाही मुंबई आणि कोकणदरम्यान आणखी एक थेट रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे. या रेल्वे सेवेच्या माध्यमातून प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल, प्रवाशांची वाहतूक अधिक सुरळीत होईल आणि कोकण मार्गावरील वाढत्या रेल्वे प्रवासाच्या मागणीची प्रभावी पूर्तता होईल. ही नवीन दैनिक एक्स्प्रेस सेवा प्रवासी संपर्काचा विस्तार, प्रवासातील सोयीसुविधा वाढविणे आणि अधिक सक्षम व सर्वसमावेशक रेल्वे जाळ्याद्वारे संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देण्याच्या भारतीय रेल्वेच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech