पंतप्रधानांविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या तरुणीचा माफीनामा

0

आंदोलनस्थळी असलेल्या लोकांच्या प्रभावाखाली वक्तव्य केल्याची कबुली
नवी दिल्ली : नीट परीक्षेतील पेपरफुटी विरोधात आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काही आंदोलक अपशब्द उच्चारत असतानाचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले होते. दरम्यान, जंतर मंतरवरील आंदोलनावेळी पंतप्रधानांबाबत अपशब्द उच्चारणाऱ्या रुचिका सिंह नावाच्या १५ वर्षीय युवतीने माफी मागितल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती माझ्याकडून मोठी चूक झाली, देशानं मला माफ करावं, असं सांगत ती माफी मागताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रुचिका सिंह ही या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण १५ वर्षांची असल्याचे सांगत हात जोडून माफी मागताना दिसत आहे. व्हिडिओत ती सांगत आहे की, मी कनॉट प्लेस येथे फिरायला गेले होते. त्यानंतर मित्र-मैत्रिणींसह आंदोलनस्थळी गेले होते. तिथे असलेल्या लोकांच्या प्रभावाखाली येत मी अशी वक्तव्ये केली. मी जे काही बोलले ते माफ करण्यासारखं नव्हतं. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मला माझीच लाज वाटतेय. देशानं मला माफ करावं.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी रात्री एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करून आंदोलनादरम्यान, आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या आणि शिविगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ करत असल्याचे जाहीर केले आहे. माझ्या आणि माझ्या दिवंगत आईबाबत वापरण्यात आलेले शब्द हे त्रासदायक होते. मात्र तरुणांना आपल्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, असेही मोदी म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेत टीका केल्या प्रकरणी रुचिका सिंह विरोधात २९ जुलै रोजी नोएडा येथील एक्स्प्रेस वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरून रुचिका हिने घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का दिल्याचा आणि जाणीवपूर्वक वातावरण बिघडवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयातील वकील स्मृती सिंह यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्या तरुणीचे वय २५ वर्षे असल्याचे नमूद केले होते. त्या महिला वकिलाच्या तक्रारीवरून, नोएडा पोलिसांनी त्या तरुणीविरुद्ध अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech