नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याची सुरुवात सर्वसामान्यांऐवजी हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी मोठा दिलासा घेऊन आली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांहून अधिक कपात केली आहे. नवीन दर १ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २०२ रुपये, तर कोलकात्यात २०९ रुपयांची कपात करण्यात आली आहे. कपातीनंतर दिल्लीतील नवीन किंमत २,७२८ रुपये , तर कोलकात्यात २,८७२.५० रुपये इतकी झाली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत यावेळीही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये घरगुती सिलिंडर ९४२ रुपये , मुंबईमध्ये ९४१.५० रुपये , कोलकात्यात ९६८ रुपये आणि चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये या दराने उपलब्ध राहणार आहे. विविध राज्यांमध्ये स्थानिक व्हॅट आणि करांमुळे किंमतीत किरकोळ फरक असू शकतो.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. यापूर्वी १ जुलैलाही त्याच्या किंमतीत १८३.५० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. याउलट, यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सात वेळा वाढ करण्यात आली होती. त्यामध्ये मार्च महिन्यात दोन वेळा दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावामुळे आणि जागतिक पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे किंमतींवर दबाव निर्माण झाला होता. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग, ढाबे आणि इतर व्यावसायिक संस्थांमध्ये केला जातो. त्यामुळे किंमतीत झालेल्या या कपातीमुळे व्यावसायिकांचा खर्च कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.