मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ अभियानाला मोठी गती

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वांकांक्षी ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड यांच्यात ₹५ कोटींचा सामंजस्य करार यासाठी करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून ‘नमो नेत्र संजीवनी’ कार्यक्रमाची विदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून, मार्च २०२७ पर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये २५ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या उपक्रमांतर्गत सर्व शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो नागरिकांना दर्जेदार व मोफत नेत्रोपचार उपलब्ध होणार असून, त्यांच्या दृष्टीचे संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पाठबळामुळेच आयजीजीएमसी, नागपूरला या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ₹५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमुळे संपूर्ण विदर्भात व्यापक स्तरावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया राबविणे शक्य होणार असून, ‘मोतीबिंदूमुक्त विदर्भ’ हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या उपक्रमामुळे केवळ मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावण्याचे प्रमाण कमी होणार नाही, तर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार नेत्रोपचार सहज उपलब्ध होतील. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात शासन, वैद्यकीय संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, ‘नमो नेत्र संजीवनी’ कार्यक्रमाद्वारे विदर्भातील हजारो नागरिकांच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech