बिहारमध्ये पॅसेंजर ट्रेनच्या इंजिनसह तीन डब्यांना आग, सर्व प्रवासी सुरक्षित

0

सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर पहाटे ३ वाजता घडली घटना

बख्तियारपूर : बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे ३ वाजता समस्तीपूर-सहरसा पॅसेंजर ट्रेन क्रमांक ६३३४४ च्या इंजिनला आणि त्याच्याशी जोडलेल्या तीन डब्यांना अचानक आग लागली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली, मात्र वेळेत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन सिमरी बख्तियारपूर स्थानकावर पोहोचताच इंजिनमधून धूर निघू लागला. काही वेळातच ही आग इंजिनपासून जोडलेल्या तीन डब्यांपर्यंत पसरली.

घटना घडली तेव्हा बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. आग आणि धुराची माहिती मिळताच प्रवाशांनी तातडीने ट्रेनमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याची चौकशी सुरू आहे. सकाळी ६ वाजेनंतर सिमरी बख्तियारपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech