नेरळ–वाकस–कशेळे एसटी बससेवा १२ वर्षांनंतर पुन्हा सुरू

0

कर्जत : तब्बल १२ वर्षांपासून बंद असलेली नेरळ–वाकस–कशेळे एसटी बससेवा अखेर सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. नेरळ बसस्थानक येथे मुसळधार पावसात झालेल्या उद्घाटन सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पावसाची पर्वा न करता ग्रामस्थ, प्रवासी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि एसटी प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे, स्थानिक प्रमुख देवानंद मोरे तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक महादेव पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बससेवेचे उद्घाटन करण्यात आले आणि पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. नेरळ–वाकस–कशेळे मार्गावरील बससेवा बंद झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन (रजि.) यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

या मागणीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) – कर्जत तालुका तसेच किसान क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य – कर्जत तालुका यांनी सक्रिय पाठिंबा दिला. विविध स्तरांवर करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतर एसटी प्रशासनाने या मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. उद्घाटनानंतर पहिली बस फेरी रवाना होताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. भर पावसातही नागरिकांनी उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण क्षणाचा आनंद घेतला. या बससेवेच्या पुनरारंभामुळे नेरळ, वाकस, कशेळे आणि परिसरातील गावांतील नागरिकांना मोठी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, शेतकऱ्यांच्या बाजारपेठेपर्यंतच्या प्रवासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. बससेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech