आसारामच्या वैद्यकीय जामिनावर सर्वोच्च न्यायालयात ६ ऑगस्ट रोजी सुनावणी

0

नवी दिल्ली : जोधपूरमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसाराम बापूंच्या अंतरिम वैद्यकीय जामिनाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालय ६ ऑगस्ट रोजी सुनावणी घेणार आहे. दरम्यान, एम्सनेआपला वैद्यकीय अहवाल न्यायालयाला सादर केला आहे. या अहवालानुसार, आसाराम बापूंना सध्या रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही, पण त्यांच्यावर २४ तास वैद्यकीय देखरेख ठेवणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने अहवालाचे पुनरावलोकन करताना त्यातील काही मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुनावणीदरम्यान त्यांचे आरोग्य, वैद्यकीय अहवाल आणि जामिनाचा अर्ज हे महत्त्वाचे मुद्दे असतील.

मागील सुनावणीदरम्यान, राजस्थान सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले की, आसाराम बापू पूर्णपणे निरोगी असून त्यांनी तीन महिन्यांपूर्वी अयोध्या आणि काशी विश्वनाथला भेट दिली होती. मेहता यांनी सांगितले की, ते सर्वत्र चालत आणि प्रवास करत होते. ३० जून रोजी आसारामच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने राजस्थान सरकारला नोटीस बजावली होती.सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापू यांना दिलेली शिक्षा स्थगित करण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापू यांना तुरुंगात पुरवण्यात येत असलेल्या वैद्यकीय सुविधा सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका असेल तरच जामीन मंजूर करण्याचा विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

आसाराम राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात असून, त्यांचा जामीन अर्ज डझनहून अधिक वेळा फेटाळण्यात आला आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली २०१३ मध्ये आसाराम यांना अटक करण्यात आली होती. २० ऑगस्ट २०१३ रोजी जोधपूर आश्रमात त्यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय, २००१ मध्ये सुरतच्या दोन बहिणींनीही आश्रमात त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech