अदीस अबाबा : इथिओपियाच्या अमहारा प्रदेशात सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन १४ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. अनेक जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही दुर्घटना त्सादकाने देब्रे मिटमाक सेंट मेरी मठात घडली. येथे शेकडो भाविक पवित्र जलाद्वारे शुद्धीकरणाच्या धार्मिक विधीत सहभागी होण्यासाठी जमले होते. दीर्घकाळापासून आजारांपासून मुक्ती आणि आध्यात्मिक उपचार मिळवून देणारा हा विधी मानला जातो.
डायोसिसचे महाव्यवस्थापक मेगाबे हादिस नेका तिबेब अबाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सकाळी सुमारे सात वाजता घडली. मृतांपैकी ११ जणांवर मठ परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, उर्वरित मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले आहेत. काही मृतदेहांची ओळख पटविणेही कठीण ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. गंभीर जखमींना नॉर्थ शेवा प्रशासकीय विभागाची राजधानी देब्रे बिरहान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, आपत्ती व्यवस्थापन विभागाची तज्ज्ञ टीम घटनास्थळी पोहोचली असून मदत व बचावकार्य सुरू आहे.
इथिओपियामध्ये जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात भूस्खलन आणि पूराच्या घटना वारंवार घडत असतात. जुलै २०२४ मध्ये दक्षिण इथिओपियात झालेल्या भूस्खलनात किमान २५७ जणांचा मृत्यू झाला होता. याच वर्षाच्या सुरुवातीला गामो प्रदेशात झालेल्या अशाच एका दुर्घटनेत १०० हून अधिक लोकांचा जीव गेला होता. अहवालानुसार, हवामान बदल आणि कमकुवत पायाभूत सुविधांमुळे देशात अशा नैसर्गिक आपत्तींचा धोका सातत्याने वाढत आहे.