‘रामायण’ आणि ‘आदिपुरुष’ची तुलना योग्य नाही – मनोज मुंतशीर

0

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ या बहुप्रतिक्षित पौराणिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, सोशल मीडियावर प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाशी त्याची तुलना होऊ लागली. आता ‘आदिपुरुष’चे गीतकार आणि लेखक मनोज मुंतशीर यांनी या तुलनेवर प्रतिक्रिया दिली असून, दोन्ही चित्रपटांची तुलना करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक चित्रपट एका विशिष्ट दृष्टिकोनातून आणि सादरीकरणासह तयार केला जातो, असे नमूद करत त्यांनी ‘रामायण’साठी शुभेच्छा दिल्या. तसेच, या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशच्या अभिनयाचेही त्यांनी कौतुक केले.

मनोज मुंतशीर म्हणाले, “यश हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे यात शंका नाही. आपल्या पौराणिक कथा जागतिक स्तरावर नेणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला मी शुभेच्छा देतो. ‘रामायण’ची तुलना ‘आदिपुरुष’शी केली जाऊ नये. ‘आदिपुरुष’ प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला, हे मान्य करण्यात काहीच गैर नाही. या चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली होती, परंतु तो एक अयशस्वी प्रयत्न ठरला.” त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

‘आदिपुरुष’च्या संगीताचा उल्लेख करताना मनोज यांनी अभिमान व्यक्त केला की, त्या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आणि खूप लोकप्रिय झाले. ‘रामायण’चे संगीतही त्याच दर्जाचे असेल किंवा त्याहूनही सरस ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान आणि हॉलिवूडचे दिग्गज संगीतकार हॅन्स झिमर हे तयार करत आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे आणि लारा दत्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २०२६ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech