कोल्हापूरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पोलिश शिष्टमंडळ दाखल

0

नवीन राजवाड्यात छत्रपती घराण्याकडून उत्स्फूर्त स्वागत
कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनी आणि सोव्हिएत युनियनने पोलंडवर आक्रमण केल्यानंतर लाखो पोलिश नागरिकांना निर्वासित व्हावे लागले होते. या कठीण काळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने १९४२ ते १९४८ या कालावधीत जवळपास पाच हजार पोलिश निर्वासितांना कोल्हापूरजवळील वळीवडे येथे आश्रय दिला. छत्रपती घराण्याचा आश्रय आणि कोल्हापूरकरांच्या आत्मीय सहकार्यामुळे या निर्वासितांना सन्मानाने नवजीवन उभारता आले.

या ऐतिहासिक ऋणानुबंधाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच वळीवडे येथील स्मारकाला भेट देण्यासाठी पोलिश शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झाले. संसद सदस्य किंगा गायेस्व्का यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापुरातील नवीन राजवाड्याला भेट दिली. यावेळी खासदार शाहू महाराज, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिताराजे आणि युवराज शहाजीराजे यांनी शिष्टमंडळाचे उत्स्फूर्त स्वागत केले. छत्रपती घराण्याच्या आपुलकीच्या स्वागताने पोलिश शिष्टमंडळ भारावून गेले.

दुसऱ्या महायुद्धानंतर पोलिश नागरिक युरोपमध्ये परतले असले तरी, अनेकांनी कोल्हापूरला आपले दुसरे घर मानले. त्यामुळे वळीवडेतील या ऐतिहासिक घटनेला भारत-पोलंड मैत्रीतील महत्त्वाचा अध्याय मानले जाते. या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी १९९८ मध्ये वस्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच २०१९ मध्ये वस्तीच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, २०१९ मध्ये महाराष्ट्र शासन आणि पोलंड सरकारने संयुक्तपणे वळीवडे येथे ‘म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस’ उभारण्याची घोषणा केली होती. कोविड महामारी तसेच कोल्हापुरातील महापुरामुळे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत विलंब झाला. मात्र, युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा उपक्रम पुढे सुरू राहिला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलिश शिष्टमंडळाने कोल्हापूरला भेट दिली. नवीन राजवाड्यात झालेल्या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि भारत-पोलंड यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech