महाराष्ट्रात राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय होणार – अमित शाह

0

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला अंब्रेला संस्थेमुळे मिळणार नवसंजीवनी

मुंबई : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे जाळे विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्यक्त केला. देशातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केली.

बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित ‘सहकार नव-क्रांती मेळावा’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पणन मंत्री जयकुमार रावल, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशीष कुमार भूटानी तसेच अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, देशातील प्रत्येक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने, अगदी एका शाखेच्या बँकेनेही अंब्रेला ऑर्गनायझेशनचे सदस्यत्व घ्यावे. सदस्यत्व घेतल्यानंतर सुरक्षा संचालन केंद्राशी (सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरशी) जोडले जावे. यामुळे बँकांमधील ठेवीदारांचा विश्वास वाढण्यास मदत होईल आणि बँकिंग क्षेत्र अधिक सुरक्षित होईल. अंब्रेला संस्था बँकिंग क्षेत्रात करण्यात येत असलेल्या नवीनतम सुधारणांची माहिती तसेच म्यूल हंटरसारख्या अनेक आवश्यक सॉफ्टवेअर सुविधा देखील या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. या अंब्रेला संस्थेच्या मदतीने कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करता येतील, जे कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रात इतरांच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी तसेच जनता आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा विश्वास संपादन करण्यासाठी अंब्रेला संस्था मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech