नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, जग आणि तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे आणि येणाऱ्या काळात तीच व्यक्ती आणि तोच समाज पुढे जाईल, जो सतत शिकत राहण्यास तयार असेल. त्यांनी तरुणांना आपली जिज्ञासा जिवंत ठेवण्याचे, प्रश्न विचारण्याचे आणि नव्या आव्हानांवर नवे उपाय शोधण्याचे धाडस ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीच्या ५७व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना सांगितले की, आज जगातील सामरिक समीकरणे आणि जागतिक शक्ती संतुलन वेगाने बदलत आहे. यामागील सर्वात मोठी शक्ती म्हणजे तंत्रज्ञानाचा वेग. पुढील २०-३० वर्षांचे जग कसे असेल, हे निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही; मात्र बदलाच्या प्रत्येक टप्प्यात आव्हानांसोबत नव्या संधीही निर्माण होतात. ते म्हणाले, “जग बदलेल, तंत्रज्ञान बदलेल, उद्योग बदलतील आणि व्यवसायही बदलतील, पण या सर्वांमध्ये माझे एक वाक्य लक्षात ठेवा- जो शिकत राहील, तो जिंकेल.” त्यांनी सांगितले की, जो व्यक्ती नव्या आव्हानांवर नवे उपाय शोधण्याचे धाडस ठेवेल, त्याच्यासाठी आव्हानेच संधी बनतील. हीच विचारसरणी आयआयटी दिल्लीने विद्यार्थ्यांना शिकवली आहे.
समारंभात ३,००० हून अधिक पदवीधरांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, ज्यामध्ये ५८७ पीएचडी संशोधकांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी प्रेसिडेंट्स गोल्ड मेडल, डायरेक्टर्स गोल्ड मेडल, शंकर दयाल शर्मा गोल्ड मेडल आणि परफेक्ट टेन गोल्ड मेडलही प्रदान केले. त्यांनी आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात स्थापन करण्यात आलेल्या एआय-आधारित हाय-परफॉर्मन्स सुपरकंप्युटिंग सुविधा ‘परम प्रज्ञा’चेही उद्घाटन केले. पंतप्रधानांनी दीक्षांत समारंभात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जीवनाच्या नव्या अध्यायाच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की, आज त्यांच्या कुटुंबीयांना ज्या प्रकारे आपल्या मुलांचा अभिमान वाटत आहे, त्याचप्रमाणे त्यांनाही सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. विद्यार्थी केवळ पदवी घेऊन जात नाहीत, तर देशासाठी काहीतरी करण्याची स्वप्ने घेऊन पुढे जात आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याचे वेगवेगळे चित्र असेल. कोणी पहिली नोकरी आणि पहिल्या पगाराची वाट पाहत असेल, कोणी नव्या शहरात नव्या सुरुवातीची तयारी करत असेल, कोणी स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचे स्वप्न पाहत असेल, तर कोणी पुढील स्पर्धा परीक्षेचे लक्ष्य निश्चित केले असेल. त्यांनी सांगितले की, मार्ग आणि स्वप्ने वेगवेगळी असली तरी आयआयटी दिल्लीमध्ये प्रवेश घेण्यापासून ते दीक्षांत समारंभापर्यंतचा प्रवास सर्वांसाठी अविस्मरणीय आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना हा क्षण पूर्णपणे जगण्यास सांगितले, कारण भविष्यात त्यांच्यावर अधिक जबाबदाऱ्या असतील, तेव्हा याच आठवणी त्यांना कॅम्पस जीवनाकडे परत घेऊन जातील. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना, शिक्षकांना, प्राध्यापकांना, मार्गदर्शकांना आणि सपोर्ट स्टाफला कधीही विसरू नये, असा सल्ला दिला आणि यश मिळाल्यानंतरही हे संबंध जिवंत आणि जपून ठेवावेत, असे सांगितले.