नवी दिल्ली : फुकेत-दिल्ली विमानाच्या एका वैमानिकाच्या डोपिंग चाचणीत मारिजुआना (गांजा) सेवन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने आपल्या समूहातील सर्व वैमानिकांची संपूर्ण डोपिंग चाचणी अनिवार्य केली आहे. हा आदेश आजपासूनच लागू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रात एअर इंडियाने म्हटले आहे की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) यांनी निर्धारित केलेल्या सर्व नियामक मानकांचे एअर इंडिया पूर्णपणे पालन करते. ही मानके युरोप आणि अमेरिकेसारख्या प्रमुख जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील नियमांप्रमाणेच आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे जाणे आवश्यक असल्याचे कंपनीला वाटते. त्यामुळे समूहातील सर्व वैमानिकांची संपूर्ण तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामागील उद्देश वैमानिक कोणत्याही प्रतिबंधित औषधाचे किंवा अमली पदार्थाचे सेवन करत नसल्याची खात्री करणे हा आहे.
एअरलाइनने स्पष्ट केले आहे की, ही तपासणी गुरुग्राम येथील अकादमीसोबतच विमान उड्डाणानंतर एअर इंडियाच्या फ्लाइट ब्रीफिंग केंद्रांमध्ये आणि कार्यालयांमध्ये केली जाणार आहे.कंपनीने पुढे म्हटले आहे की, नियामक मानकांच्या पुढे जाऊन उचललेले हे पाऊल एअर इंडियाच्या सुरक्षा आणि व्यावसायिकतेच्या उच्च निकषांचे प्रतिबिंब आहे. या तपासणीचा मुख्य उद्देश प्रवासी, भागधारक आणि समाजाला हा विश्वास देणे आहे की, एअर इंडिया सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. एअर इंडिया अनेक दशकांपासून भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील प्रमुख विमान कंपनी राहिली आहे. या काळात कंपनीच्या वैमानिकांसह इतर कर्मचाऱ्यांची व्यावसायिकता, कौशल्य आणि सुरक्षेबाबतची बांधिलकी यामुळे लाखो प्रवासी आणि सर्वसामान्यांचा विश्वास संपादन झाला आहे. हा विश्वास आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. हा विश्वास कायम राखण्यासाठी आणि तो अधिक दृढ करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे आमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अलीकडेच आपल्यापैकी अनेकांनी आमच्याशी संपर्क साधून याच भावनेला पाठिंबा दर्शवला आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.