बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : राहुल गांधींची सर्वोच्च न्यायालयात धाव

0

अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला दिले आव्हान

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रकरणातील आरोपांची सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) पडताळणी करण्याच्या निर्देशाविरोधात त्यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राहुल गांधी यांनी या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाऐवजी दिल्ली उच्च न्यायालयात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी करणारी स्वतंत्र हस्तांतरण याचिकाही दाखल केली आहे. दोन्ही याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान सरन्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी होणार आहे.हे प्रकरण कर्नाटकातील भाजप कार्यकर्ता विग्नेश शिशिर यांनी दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे. या तक्रारीत राहुल गांधी यांच्यावर उत्पन्नाच्या तुलनेत अधिक संपत्ती अर्जित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मे २०२६ मध्ये सीबीआय आणि ईडीला कायद्यानुसार आरोपांची चौकशी व पडताळणी करण्यासंदर्भात निर्देश दिले होते.उच्च न्यायालयाने यापूर्वी ईडीला तपासादरम्यान कोणतीही अनियमितता आढळल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याची मुभाही दिली होती. तसेच सीबीआयने सादर केलेल्या अहवालाबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त केले होते. आता राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech