ठाकरेंचे बंडखोर खा. संजय देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

0

अनुपस्थित राहिल्यास होणार एकतर्फी सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा बंडखोर खासदारांविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान दिले आहे. त्या अंतर्गत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली आहे. खा. सावंत यांचे स्वीय सहाय्यक दीपक घोगल हे मुंबईहून नोटीस घेऊन थेट संजय देशमुख यांच्या चिंचोली (जि. यवतमाळ) येथील निवासस्थानी पोहोचले. या वेळी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसह यवतमाळचे जिल्हाप्रमुख आणि स्थानिक ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. विशेष म्हणजे, नोटीसमध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, बंडखोर खासदार न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीतच एकतर्फी सुनावणी घेतली जाईल, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काही महिन्यांपूर्वी यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख यांच्यासह धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात होता. आता या सर्व खासदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गटाने कायदेशीर लढाई तीव्र केली असून, सर्वोच्च न्यायालयाच्या या नोटिसीमुळे शिंदे गटातील बंडखोर खासदारांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सध्या मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे. गेल्या तीन ते चार सुनावणींमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech